योगेश नातू

UNIX 2019
 
सर,
नमस्कार ,काल UNIX ची  Batch पूर्ण झाली आणि मी तुमचा Official विदयार्थी झालो.  या पुढे मी आता स्वतःला डॉ विजय गोखले सरांचा विद्यार्थी आहे, असे अभिमानाने म्हणू शकतो.

मी माझा थोडासा परिचय देतो. मी तुमच्यापेक्षा दोन वर्ष व दोन महिने लहान आहे.  १९९२ साली मी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सची  डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण केली.  त्यानंतर लगेचच मी माझ्या मित्रांबरोबर इलेक्ट्रॉनिक्स development चा  व्यवसाय सुरु केला. मधे एक वर्ष मी जॉब पण केला. १९९६ साली मी माझी छोटी कंपनी सुरु केली. त्यात मी Custom built developments  कामे सुरु केली. त्यात मी embedded systems design & develop  करत होतो. १९९६ साली मी Turbo C  वापरून आणि embedded  system interface करून पूर्ण Testing  & Automation System design  केली.

२००१ साली मी VB६ आणि  २००८ साली मी .net पण शिकलो. काही SPM  मी .net आणि PLC वापरून केली. पण माझा main focus  हा embedded  systems  हाच होता. २०१७ पर्यन्त मी फक्त assembly  language  वापरूनच प्रोग्रॅमिंग करायचो. त्यानंतर मी embedded  C वापरायला सुरवात केली. तेव्हापासून मला मोठ्या व complex embedded systems ची requirement  यायला सुरवात झाली. त्यात OS  ची गरज होती. तेव्हापासून मला OS  शिकायची होती. परंतु कामाच्या load  मुळे, आज करू उद्या करू असे करत त्याला कधीच मुहूर्त सापडला नाही.

माझी मुलगी २०१९ साली BE ( E &TC) झाली. तिला लगेच JOB मिळाला.  सगळयाना हा प्रश्न पडतो कि स्वतःची कंपनी असताना तिनं बाहेर का जॉब करायचा?. पण मी तिला सांगितले आहे कि किमान ५ वर्षे बाहेरचा अनुभव घे आणि नंतर काय ते ठराव.  माझ्या  मुलीला तिच्या कंपनी मध्ये तुमच्या बद्दल कळले तेव्हा तिनें या क्लास बद्दल सांगितले. मी नेटवर search केले व मला इंटरेस्टिंग वाटले. मी आधी मुलीला विचारले कि जर क्लासनी मला ऍडमिशन दिली तर मी तिथे आलेले तुला चालेल का? तुला awkward  होणार नाही ना? तिची काही हरकत नसल्यामुळे मी admin  ला मेल पाठवून माझ्याबद्दल वय आणि व्यवसाय याची पूर्ण idea  दिली. Admin  कडून OK  असा रिप्लाय आल्यावर मी व मुलगी क्लास ला जाणार हे नक्की झाले. माझा पुतण्या डिप्लोमा कॉम्प्युटर  २ऱ्या  आहे. त्याला पण हा क्लास करायचा होता.

७ डिसेंबर २०१९ ला आमच्या तिघांची Admission Process complete  झाली. अतिशय organized  पद्धतीने Admission झाली.

१६ डिसेंबरला तुमचे पहिले Lecture  सुरु झाले. त्यानंतरची पहिली ६ Lectures मी कधीच विसरणार नाही. खूपच inspiring  आणि motivating lectures होती ती.त्यानंतर तुमची शिकवायची पद्धत खूपच आवडली. कधी विषयात आत गेलो हे कलेचं नाही. कदाचित दुसरे कुणी असते तर मी क्लास, कामाच्या लोड मुळे मधेच सोडू शकलो असतो. तुमची दोन सेमिनार Attend केली. दोन्ही सेमिनार मधून खूप नवीन शिकायला मिळाले. Corona नंतरची सगळी Lectures  मी, पत्नी व मुलीने मोबाइल कास्ट करून TV  वर बघितली, व मुलगी दोघांचा Attendance लावायची.

तुम्हाला Personally  भेटायची खूप इच्छा होती, पण दुसऱ्या दिवशी पुतण्याचे कॉलेज व मुलीची कंपनी असल्यामुळे रात्री क्लास झाल्यावर लगेच निघायला लागायचे. असे वाटले होते के मधे कधी तरी भेट होईल, पण corona  मुले ते शक्य झाले नाही. एकदा परिस्तिथी normal  झाल्यावर या UNIX  च्या batch  चे छोटेसे Get together आनंदाश्रममधे  झाले तर बरे होईल.

अजून एक छोटा अनुभव, लहानपणी शाळा, कॉलेज मध्ये मला कधीही शिक्षा झाली नव्हती.  एक दिवस मी I -Card विसरलो. नियमाप्रमाणे मला १० उठाबशा काढाव्या लागल्या. याबद्दल Admin  चे कौतुक केले पाहिजे. त्यांनी सर्व स्टुडंट्सला सारखी Treatment  दिली. तिथे कोणीही Special नव्हतं.

साधारणतः दर २/३ वर्षांनी मी एखादा नवीन Technical  Course करतो. पण कॉलेज नंतरचा हा शिक्षणाचा अनुभव,सगळ्यात “लै भारी क्लास होता येड्या”, असेच म्हणता येईल. खरोखर आम्ही सर्व स्टुडंट्सनी हा क्लास एन्जॉय केला.

तुमच्या सारखेच  मला ज्योतिषमध्ये रस होता . मी मध्ये काही वर्षे ज्योतिष्य  शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण तुमच्या सारखा गुरु या विषयात मिळाला नाही (मला जमले नाही त्याचे हे ‘कारण’ आहे).

मला SDK चा क्लास लावायला खूप आवडला असता, पण माझा फोकस embedded  मधेच आहे. २०१४ नंतर मी PC software फक्त इंटर्नल टेस्टिंग पुरते करतो. त्यामुळे जसा मला OS  चा उपयोग होईल, तसे SDK चे अँप्लिकेशन होणार नाही. हे कारण म्हणजे १) You  know  Sir  २) वेळ नाही आणि ३) सर, मी कि नाही, माझं कि नाही , या प्रकारातले असू शकते. त्याबद्दल Sorry … पण माझी मुलगी आणि दोन पुतणे हा क्लास जॉईन करणार आहेत.

हा क्लास अतिशय चांगल्या पद्धतीने Organize  केल्याबद्दल श्रेणीक, निहारा आणि मॅडम याचें खूप आभार. तसेच मयूर, अमेय आणि सहकारी यांचे पण आभार. सोवनी, शेवाळे यांची ओळख व्हायला सुरवात झाली होती, पण तेवढ्यात Corona ब्रेक झाला.  तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे, पण SDK ची पहिली ३ Open to all lectures  नक्कीच बघणार आहे.

तुमचा विद्यार्थी,

योगेश नातू
(UNIX2019 Batch, ID-050)
🙏🙏
 


निकिता राजिवडे

WinRT 2017, UNIX 2017, RTR 2018

दंडवत प्रणाम सर,

मी सरांचं पहिलं seminar केलं ते Unix Seminar. त्यानंतर सर्व seminars व Unix, Win32 SDK batches पूर्ण केल्या.

मग OpenGL seminar भाग १, भाग २, भाग ३ असे सगळेच पूर्ण केले. त्यात जे काही शिकले त्याच्या basis वर एक साधा Doraemon cartoon चा demo तयार केला.

सरांनी केलेले OpenGL चे demos पाहून असे चमत्कार code ने करता येतात हे उमझले आणि ते coding आपण शिकायचं हे ठरवलं.

त्याचा पुढे काय आणि कसा उपयोग होईल, so called scope काय असेल, या skillset मध्ये आपलयाला job मिळेल का , असे कोणतेही प्रश्न मनात आलेच नाहीत कारण code करून असे output screen वर पाहणे यातच खूप समाधान मिळणार होते.

मस्त शिकून coding करूयात ते पण across multiple platforms, असे भारी demos करून Hawa करायची, shining मारायची बस हेच लहानसं स्वप्न.

Class ला admission घेतली. Class आणि Job सोबतच सुरु झाले.

१ वर्ष होत आला OpenGL शिकत होते. Office मध्ये team ला माहित होते कि मी Graphics Programming करतीय ते पण इतके पैसे व वेळ invest करून. त्यांनी मला समजावलं कि तू याच क्षेत्रात काम मिळवण्याचा प्रयत्न कर. मनात सरांच वाक्य आठवलं,

“Don’t learn to earn, but try to earn from whatever you learn”.

आपल्या हातात प्रयत्न करणे असतं बाकी जे मिळायचा ते मिळेलच मग ठरलं तर Graphics programmer job साठी apply करायचे.

एक विशेष बात म्हणजे Resume मध्ये Education Section open करून त्यात आपलं Real Time Rendering at AstroMediComp add केलं होतं.

पहिलं तर Resume shortlist झाला त्या company चा फोन आला कि 5 Rounds होतील, म्हटलं ठीक आहे नसीब आजमाते है.

पहिला Round होता General aptitude ते solve करून दिले.

दुसरा Round होता Technical assignments, त्यात एक OpenGL आणि बाकी C++ असे code करून द्यायचे होते.

OpenGL assignment होती ती म्हणजे एक curve generation करायचे, त्या geometry ला extrude करायचे आणि त्याला texture लावायचे. आधी भीती वाटत होती कि जमेल कि नाही, पण code करायचाच, कमीतकमी त्यातून एक अनुभव येईल कसे प्रश्न सोडवायचे ते तरी कळेल म्हणून केले सुरु काम.

त्यांनी सांगितलेले कि C किंवा C++ based Graphics API म्हणजे OpenGL , DirectX इत्यादी वापरून code करू शकता आणि extrusion चे main logic स्वतः लिहायचे.

आधी तो curve काय आहे ते वाचलं विकिपीडिया वर, तिथे मग थोडं गणित समझून घेतले आणि code करायला सुरुवात केली. पहिला आठवला तो tessellation मध्ये केलेला आपला Bezier curve त्यालाच base code म्हणून घेतले. पुढील काम सुरु केले curve तर दिसत होता पण आता texture कसे लावायचे याचे प्रयत्न सुरु झाले थोडे अडथळे यायला लागले म्हणून तो बाजूला ठेवला आणि नवीन code करूयात using simple 2D Colored Shapes as a base code असे ठरवले यामध्ये algorithm लिहून, मग geometry extrusion, आणि मग त्याला texture लावून code पूर्ण केला. दुसऱ्या बाजूला cpp चे code पण पूर्ण केले आणि दुसरा round संपला.

भारी वाटत होते… मी code enjoy केला होता आता result काहीही आला तरी tension नव्हतं.

Result आला ते बोलले congragulations you have cleared second round.

पुढचा round होता technical question and answers

First question होता दुसऱ्या round मध्ये केलेला code कसा केला ?

आपण सरांचे विद्यार्थी, code मध्ये केलेली line आणि line समझलेली पाहिजे, तुमचा code तुम्हाला सांगायला plus शिकवायला हि जमला पाहिजे ?

Code template आपलाच असल्यामुळे मग काय घाबरायचं !!!

Geometry extrusion चे logic त्यांना समझावले. ते बोलता बोलता texcoords वर आम्ही आलो, मी extruded geometry draw करताना 3 curves वापरले होते, त्यात middle main curve, up curve and down curve असे बाकी 2 curves यांचे vertices घेऊन quads काढले. एक quad बनला होता 2 triangles ने एका triangle ला texcoords जसे देतो तसे इथेही दिले.

मग actual code open केला .cpp file त्यामध्ये घुसलो सर्वात पहिला प्रश्न असा कि data कसा पाठवला किंवा data वर operations कसे केलेत ?

मी सांगितले vertex array objects(vao) वापरून data कसा आपण vertex buffer objects मध्ये GL_ARRAY_BUFFER या target ला bind करतो . सरांनी शिकवलेला vao म्हणजे initialize मध्ये केलेले recorded cassette आणि तीच cassette draw मध्ये वाजवली कि drawing होणार मग vao नसेल तर आपल्याला त्या 4 lines glBindBuffer, glBufferData, glVertexAttribPointer and glEnableVertexAttribArray या draw मध्ये वारंवार लिहाव्या लागणार.

Data तर ठेवला vbos च्या आत, पण आता shaders आले त्यात attribute आणि uniform मध्ये काय फरक आहे असे विचारण्यात आले,

for an vertex it’s attribute can be position, color, texcoord, normal which changes per vertex but uniform remains same for all vertices in a every draw call, then how do we get this location? answer was using glBindAttribLocation for attributes and glGetUniformLocation for uniforms.

असाच code scroll होत असताना मधेच त्यांनी थांबवले glVertexAttribPointer काय आहे ? ……………………………

( खरंच हे प्रश्न उत्तर चालू असताना मागचे 1.5 वर्ष डोळ्यासमोर येत होते, कसली भीती नाही काहीही विचारा आमचाच code आहे आम्ही सांगू शकतो हा confidence जो आपल्याला सरांनी मिळवून दिलाय तोच मला पुढे नेत होता.

केलेल्या सर्व assignments आठवत होत्या,

” याजसाठी केला होता अट्टहास ।

शेवटचा दिस गोड व्हावा ।। ”

सतत क्रिया करत राहिलो त्याचं फळस्वरूप सर तुम्ही आम्हाला जी अभ्यासाची शिस्त लावलीत त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. )

चला …. glVertexAttribPointer is used to provide format of data which includes it’s type, glBindAttribLocation ने जे attribute location मिळवले ते द्यायचे , no of components for that attribute like for position 3 (x, y, z), त्यानंतर data वाचताना किती ढांगा टाकायच्या तो stride आणि कुठून start करायचं तो offset, तर normalized data आहे कि नाही अशी सर्व parameters द्यावे लागतात.

मला इतकं समझलं होतं कि interviewer check करतायेत कि code copy paste तर केला नाहीये ना

मनात आले कि, विचार बाबा विचार, जणू काय माझ्या मागच्या १ वर्षात मी काय केले त्याची परीक्षा चालू होती.

मग गेलो draw मध्ये draw arrays आणि draw elements वर चर्चा जमली तेव्हा सांगितले कि जिथे heavy models load केले जातात तिथे vertices नाही वापरायचे तर त्या vertices ला indices लावून ते model draw करायचे म्हणजेच memory wise उत्तम तर data repetition पण होत नाही.

मग आलं glUniformMatrix4fv, प्रश्न होता सगळे parameters explain करा, मी 3 बरोबर सांगितले आणि 4th मला on the spot नाही आठवला.

Uniform ची value shader ला पाठवण्यासाठी हे function वापरतात असे सांगितले, तर integer uniform ला value कशी पाठवणार असे विचारले त्यांनी, आपले उत्तर ready glUniform1i.

Normals म्हणजे काय? आपल्या diffuse light on cube या assignment मधे surface normals जे आपण वापरलेत ते कसे घेतलेत सांगितले.

OpenGL चा प्रवास संपला आणि C++ वर बरेच प्रश्न विचारले त्यांचीही उत्तरे दिली

थोडे logical problems code ने सोडविले.

हुश्य …. ! हा round १ तास २० मिनटात संपला.

या round मध्ये मझ्या आली, खूप आनंद होत होता. सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरांचे lecture आणि assignments यांमध्येच मिळून गेले.

आता पुढचा round होता detail indepth technical

Resume मध्ये मी 3 personal projects mention केलेले, त्यातला एक म्हणजे shadowing special effect, interactive object वाला.

पहिला प्रश्न आला shadowing कसं केलंय ? उत्तर दिले LightSpaceMatrix वापरून प्रत्येक vertex ची z value that is depth हि LightSpaceMatrix मध्ये बसत नसेल तर त्याची shadow पडणार आणि त्याचा depthmap / texturemap तयार करायचा.

Then while drawing use 2 different shader program objects, One for generating shadow and another for regular drawing. For shadow map use framebuffer as drawing destination and for regular drawing use color buffer as drawing destination.

असं मला जितके समझले hote ते सर्व बोलले next question असा होता कि volume shadows काय असतात ? वाजली डोक्यात टणटण, मी अजून volume shadows केले नाहीये असं स्पष्ट मी त्यांना केले.

OpenGL Pipeline सरांनी आपल्याला शिकवली होती आता त्यावर प्रश्न सुरु झाले …

आलो pipeline वर , खालील pipeline explain केली vertex shader->tessellation control shader->tessellation evaluation shader->Geometry shader->Primitive Assembly->Clipping->Rasterisation->Fragment shader

आणि पुढचा शब्द भार उचलला तो rasterization ने rasterization म्हणजे काय तर सोप्या भाषेत 3D pyramid 2D screen वर कसा दाखवायचा.

Input for rasterization is updated primitives which have undergone clipping in previous stage and output of rasterization is collection of pixels called as fragment तर या पुढच्या stages मध्ये per fragment operations perform केले जातात. Vertex shader and fragment shader are compulsory, tessellation and geometry shaders are optional.

All of above shaders, process the data associated with each vertex. मग येते primitive assembly which assembles these vertices to make a geometric primitive from it.

आता विषय निघाला तो front and back buffers चा मला इतकं झटकन नाही आठवलं पण नुकतेच आपले iOS झालेले शिकून, त्यात आपल्याला front and back buffers, double buffering ची concept clear झालेली. तीच explain करायला घेतली एक buffer मध्ये आपण rendered image तयार ठेवतो आणि दुसरा buffer म्हणजे जो screen वर दाखवतो. म्हणून जर rendered image वाला buffer screen वर दाखवायचा असेल तर आपण buffers ला swap करतो.

Next question असा होता कि culling काय आहे मी त्यांना back face culling चं example घेऊन concept explain केली.

OpenGL चे प्रश्न विचारून झाले होते नंतर cpp चे प्रश्न विचारले आणि हा round आमचा जवळपास २० मिनटात संपला.

हा round ठीकठाक गेला काही प्रश्न जमले काही नाही जमले. पण एकूणच चांगला गेला.

१ दिवसातच त्यांचा मला फोन आला कि you have cleared all rounds आणि salary discussion चा एक शेवटचा round झाला.

As a fresher with 1 year hands – on experience in Graphics programming, त्यांनी मला Graphics Developer च्या Profile साठी select केलं.

हे सर्व कसे शक्य झाले ते मात्र एक कानमंत्र जो सरांनी आपल्याला दिलाय –

“ bhavabhyasanam abhyasah Silanam satatam kriya “

तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला असेच निरंतर लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– धन्यवाद सर

सरांना नमन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. माझे काही चुकले असेल तर कृपा करून क्षमा असावी.

तुमची कृतज्ञ विद्यार्थिनी,
निकिता राजिवडे


अमेय विलास महाडदळकर

UNIX 2018, WinRT 2019    

!!श्री !!

आदरणीय  सर ,

तुम्हाला भेटुन , बघुन अनुभवायला लागुन  एक वर्षापेक्षा जास्त  काळ झाला. तुमच्याविषयीच्या भावना शब्दात मांडणं खरंतर कठीणच आहे आणि तुमच्याविषयी काही लिहावं एवढी माझी पात्रता / कुवत (खरंतर लायकीच म्हणायला हवं , पण तुमच्याच संस्काराचा भाग म्हणून भाषा जपून वापरायचा प्रयत्न करतोय.) अजिबात नाही . पण तरीही वारंवार तुमच्याबद्दल वाटणारं प्रेम, माया, आपुलकी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदर हे कुठंतरी, कधीतरी लिहून  ठेवावंसं वाटत होतं म्हणून हा एक तोकडा प्रयत्न.

सर , खरंतर तुम्हाला भेटायच्या आधी जेंव्हा केंव्हा समाजातील काही खूप यशस्वी व्यक्तींना बघायचो तेंव्हा त्यांच्याकडं बघुन मला खूप भरून यायचं कारण त्यांनी केलेले अफाट कष्ट, अविरत मेहनत, आणि त्यांची त्याच्या कलेवर ,कामावर असणारी  श्रद्धा , निष्ठा , प्रेम दिसायचं . जसं तुम्ही आम्हाला नेहमी सांगत असता की computer हा तुमच्यासाठी सचिनची bat , लतादीदींचं गाणं,पं . हरिप्रसाद चौरासियाजींची बासरी होऊ द्या मग बघा जादू. अगदी तसंच काही मला आशाताई ,महेश काळे , राहुल देशपांडे , सचिन तेंडुलकर , विराट कोहली अशा लोकांना बघितलं कि वाटतं . या सगळ्यांचं अवलोकन करताना मला अजून एक गोष्ट आढळली जी ह्या सगळ्यांत साम्य दर्शवते ती म्हणजे या प्रत्येकाचे आपापल्या गुरूंवर नितांत प्रेम आणि अढळ श्रद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे गुरूसुद्धा खूप, खूप  ताकदीचे, सिद्धहस्त आणि पूजनीय होते /आहेत.

हे सगळं बघितल्यावर मनात सारखं यायचं की आपल्याला असे सिद्धहस्त गुरु भेटले तर किती बरं होईल आणि आज मला हे सांगताना ऊर खूप भरून येतो (अर्थात अभिमानानं ) की हो मलापण माझे , स्वतःचे असे सिद्धहस्त गुरु भेटलेत आणि साक्षात दैवतासमान आहेत ज्यांचं नाव डॉ . विजय दत्तात्रय गोखले . सर मला तुम्ही भेटलेल्याचा आनंद तर आहेच पण त्याहून जास्त आनंद तुम्ही डॉक्टर असूनसुद्धा माझ्या क्षेत्रात (मी शिक्षण घेतलेल्या ) आहात आणि तुम्ही सर्वकाही मायबोलीत (आई माईच्या भाषेत ) शिकवता याचा आहे . 

सर, गेल्या वर्षभरात तुमच्याकडून उदंड गोष्टी मिळाल्या , त्या अजून मिळतायत आणि त्या मिळतच राहतील. त्यातीलच मला आत्ता आठवणाऱ्या ठळक गोष्टी म्हणजे संस्कार, पालकत्व (parenting), कला, coding चं महत्व आणि आयुष्यातलं fundamentals चं असणारं अनन्यसाधारण स्थान. मग ते computer fundamentals असोत वा life fundamentals.

सर , तुम्ही तुमच्या प्रेमानं , मायेनं आणि आपुलकीनं अनेक विद्यार्थ्यांना अक्षरशः विकत घेतलंय आणि तुमच्यासोबत मॅडमनीसुद्धा ते लीलया साध्य केलंय. खरंतर मॅडमनी आमच्याशी एवढ्या प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं वागण्याची काही गरज नाही पण त्यासुद्धा तुमच्याच पत्नी , त्या कशा जीव लावण्यात मागं राहतील? विद्यार्थ्यांचा जेवढा जीव सर तुमच्यावर आहे ना तेव्हढाच तो मॅडमवरसुद्धा आहे आणि मला तर त्यांना “गुरुमाय ” म्हणून मिरवताना खूप आनंद होतो. (मी तुमच्यासोबत मॅडमचं नावपण प्रौढीनं मिरवतो). सर हे असं घडण्याचं कारण माहितीये? ते म्हणजे तुम्ही आमच्याशी ज्या हक्कानं , अधिकाराने आणि जबाबदारीनं हे सगळं आमच्या पचनी पडता तो हक्क, अधिकार आणि ती जबाबदारी.

सर , तुमच्याविषयी भारी वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे तुम्ही तयार केलेले तुमचे विद्यार्थी आणि आमचे शिक्षक. योगेश्वर सर , पियुष सर, स्वप्नील सर , शशी सर यांच्याकडं बघितलं कि कळतं की तुम्ही फक्त उत्तम शिक्षक तयार करण्याचं ध्येयच ठेवलं नाही तर त्याला अत्यंत संयुक्तिक आणि अभिमानास्पद असं मूर्त स्वरूपसुद्धा आलंय आणि अजून येत राहील. सर तुमचे खूप खूप आभार , तुम्ही आम्हाला या साऱ्यांना भेटण्याची , अनुभवण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याची संधी दिलीत .

 सर, धन्यवाद . तुम्ही आम्हाला अशा अनेक गोष्टी शिकवल्या ज्या आम्हाला माहिती होत्या पण  विचारच केला गेला नव्हता. जसं कि देशप्रेम . तुमचं आपल्या देशावर असणारं प्रेम आणि तेच तुम्ही आमच्या मनात पुन्हा एकदा प्रज्वलित केलंत. देश सोडून जाताना तुम्ही तुमचा best effort दिलात का?हा मनाला चिचरायला लावणारा प्रश्न, तसंच देशानं मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो अथवा आजवर दिलं हा विचार म्हणजे जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचंच उदाहरण आहे आणि हे प्रश्न तुम्ही ज्या पोटतिडकीने आमच्यासमोर मांडता ती भावना नक्कीच आमच्यापर्यँत पोहोचते आणि गांभीर्यानं विचार करायला लावते. त्यातुन तुमचा आमच्यातही ती राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा उद्देश काही अंशी किंबहुना बहुतांशी सफल होतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे योगेश्वर सर. (जो माणूस आपल्या कष्टाच्या पैशांवर पाणी सोडून परत आपल्या मायदेशात येतो त्याला बघून खरंच तुमचे सर्व प्रयत्न आणि ईच्छा सार्थक होताना दिसतात.)  

सर, तुम्ही आम्हाला दिलेला अजून एक विचार जो मनात असाच आयुष्यभरासाठी घर करून गेला तो म्हणजे, आपलं आपल्या संस्कृतीवर प्रेम असावं. आपणच ती जपली, अंगिकारली आणि वृद्धिंगत केली पाहिजे. यासाठी तुम्ही दिलेली दोन उदाहरणंपण प्रकर्षानं आठवतात. एक म्हणजे South Indian मुली अथवा स्त्रीया IT मध्ये असूनही कपाळावर कुंकू आणि केसात गजरा माळून आपली संस्कृती जपतात आणि दुसरा उदाहरण म्हणजे आपली मिठु (प्रज्ञा) जी एकटीच टिकली लावून कॉलेजला जाते आजही. कारण तिला तिच्या दिसण्यापेक्षा (ती तसंही छानच दिसते) कामावर, क्षमतेवर (coding) खूप विश्वास आहे आणि तुम्हीसुद्धा तेच शिकवत असता. हे दोनच नाही तर अशा अनेक विचारांचं बीज तुम्ही आमचं मनात पेरलंय पण या दोन विचारांनी थोडं जास्त अंतर्मुख केलं म्हणून त्यांचा उल्लेख इथं केला.

सर, तुम्ही आम्हाला समाजातील, आपल्या क्षेत्रातील महान व्यक्तींचा आदर करायला आणि मान ठेवायला शिकवलंत, म्हणजेच तुम्ही आम्हाला स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिकवलंत.  पण त्याचवेळी आपल्या कक्षा कशा रुंदावतील हे सुद्धा शिकवला आणि त्यासाठी नेहमीच पंखात बळ दिलंत. तुमच्याकडून ही गोष्ट आपसुकच शिकण्याचं कारण म्हणजे तुम्ही स्वतः ती आचरणात आणता आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटणार आदर पदोपदी व्यक्त करता. जसा तो तुम्हाला Dennis Ritchie , Ken Thompson, Maurice  J  Bach, Bjarne Stroustrup  या आणि अशा अनेक व्यक्तीबद्दल वाटतो. नाहीतर, आम्ही पूर्वी या सगळ्यांची नावं एकेरी घायचो आणि मनात आदर होता कि नाही याबद्दल साशंकता आहेच. पण तुमच्याकडे शिकल्यावर ती साशंकता दूर झाली आणि आदर वाढला.

आजपर्यंत सर माझं नुसता जगणं सुरु होतं म्हणजे आलेला दिवस संपेपर्यत समोर जे येईल ते करणे. त्यात काहीही विचार नसायचा. मग एकेदिवशी अचानक असा वाटलं कि आपण काय करतोय आयुष्यात? काही हेतू तर नव्हताच पण आयुष्य भरभरून जगणंसुद्धा घडत नव्हतं. पण सर तुमचा आयुष्यातला प्रवास बघितला की आयुष्य भरभरून कसं जगायचं याचं एक उत्तम उदाहरण मिळतं आणि प्रेरणासुद्धा मिळते. जसं की मी म्हणालो आयुष्य जगण्याचा हेतू मिळालाय की नाही माहिती नाही पण आयुष्य पुरेपूर जगण्याची उमेद नक्की मिळालीये. ती कुठे हरवू नये इतकंच वाटतं. तुमचा प्रत्येक क्षेत्रांतील वावर आणि प्राविण्य हेच दर्शवत असतं कि प्रत्येक क्षण भरभरून जगा.

सर, तुम्ही आम्हला नाती जोडायला, जोडलेली नाती जपायला, टिकवायला आणि समृद्ध करायला शिकवलंत. नात्यातली आपली जबाबदारी ओळखण्यासाठी तुम्ही दिलेलं नवरा बायकोचं उदाहरण न विसरण्यासारखं आहे. जिथं तुम्ही असं म्हणता की, लग्नानंतर नवऱ्यानं त्याच्या बायकोचा बाप आणि बायकोनं तिच्या नवऱ्याची आई व्हावं. हे त्याच्या नात्यातील जबाबदारीची जाणीव करून देणारंच वक्तव्य आहे.याचबरोबर तुम्ही पालकत्वावर खूप बोलता आणि आपणच कसे आपल्या पाल्याचे Hero / Heroine  असायला पाहिजे ते सांगत असता. त्याचवेळी तुम्ही हे मिठुच्या बाबतीत लयिवेळा करून दाखवलंयत.

बोलताना कसं भान ठेवून बोलावं, बोललेल्या वक्तव्यांची जबादारी कशी घ्यावी हे तुम्ही ” A  sword  kills one person at a time, but a word can kill millions at a time” या एका वाक्यातून सांगता ते कधीच विसरण्यासारखं नाहीये.  तुम्ही केलेला अजून एक संस्कार म्हणजे “अन्नाचा आदर”. अन्न कधीच वाया घालवू नये ताटात वाढलेला प्रत्येक कण संपवावा.

UNIX शिकताना झालेला नव्हे तुम्हीच घडवलेला अजून एक बदल म्हणजे की, तुम्ही आम्हाला नम्र व्हायला शिकवलंत. आपल्याला काही येत नाही, आपण किती खुजे आहोत आणि असं असताना पण आपण उगाच किती प्रौढी मिरवतो हे तुम्हीच प्रेमानं, रागानं, आपुलकीनं आणि प्रसंगी डोळ्यात अंजन घालून दाखवून दिलंत. आज अंगी जो काही नम्रपणा आलाय विशेषतः system (computer) विषयीचा तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच सर. अजूनही बऱ्याच बाबतीत तो नम्रपणा तुम्ही शिकवलात पण system विषयीचा नम्रपणा आणि आदर आता अंगवळणी पडू लागलाय हे नक्की.

आपल्या गुरुंवरचं निस्सीम, नितान्त, आणि निस्वार्थ प्रेमपण या गुरुकुलातच अनुभवायला मिळालं. गुरूंसाठी काहीही करायची प्रेरणा आणि तयारी तेही विना मोबदला आणि कुठल्याही वेळी गुरूंच्या एका शब्दावर फिदा होणारे विद्यार्थी हे आजच्या जगातील एक दुर्मिळ नातं आम्ही खूप भरभरून जगतोय आणि याची दोन मोठी उदाहरणं म्हणजे (तशी असंख्य आहेत पण दोन जी आपल्याला रोज भेटतात) आपली निहारा आणि श्रेणिक. दोघंही इतकी वर्षं अव्याहतपणे Admin ची जबाबदारी इतक्या लीलया पार पडतायत कि त्यांचा हेवा वाटतो.  त्याच्या या अविरत व्रतामध्ये गुरुंवरची श्रद्धा, माया, प्रेमतर आहेच पण त्याच गुरूंनी केलेला एक संस्कार आहे तो म्हणजे ” उतू नका, मातु नका घेतला वसा टाकू नका . “

सर, निहारा तर रोजच आमच्यासाठी, तुमच्यासाठी धावपळ करत असते मग तिची तब्येत बरी असो व नसो तिची ती धावपळ, पळापळ थांबत नाही. पण यावर्षी मला UNIX २०१९ च्या Admission process मध्ये volunteer होता आलं आणि तिथं अनुभवलं की श्रेणिकसुद्धा तितक्याच तन्मयतेनं, आपुलकीनं आणि जबाबदारीनं सगळं सांभाळत होता आणि आम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्यांचं नीट निर्वहन होतंय ना याची खबरदारी घेत होता. खरंतर श्रेणिक हे सगळं गेली चौदा वर्ष करतोय पण दरवर्षी त्याचा उत्साह आणि उमेद अगदी पहिल्या वर्षीसारखीच असते. प्रसंगी या दोघांना काही कणखर भूमिका घ्याव्या लागतात आणि आमच्यासारख्या  विद्यार्थ्यांना त्यांच्या वागण्या बोलण्याचं वाईटही वाटतं पण नंतर लक्षात येतं की जर ते त्या प्रसंगात कठोर वागले नसते तर परिस्थिती हाताळणं अशक्य झालं असतं. पण एकूणच काय निहारा आणि श्रेणिकचं कौतुक आणि हेवा दोन्ही वाटतं.

सर, तुमच्याकडून आजपर्यंत उदंड गोष्टी, संस्कार मिळाले आणि ते यापुढेही मिळत राहतील यात शंका नाही. तुमच्याविषयी लिहिण्यासारखं खूप  काही आहे.  पण सगळ्याच भावना शब्दात बांधणं शक्य नाही आणि खरंतर माझी तेवढी पात्रतापण नाही म्हणून मी माझं हे छोटेखानी मनोगत इथंच थांबवतो

आणि पुन्हा एकदा , मी तुमचा आजन्म ऋणी आहे.

           “खूप खूप धन्यवाद सर.

तुमच्याकडून आजवर मिळालेल्या आणि इथूनपुढे मिळणाऱ्या प्रेम, माया, आपुलकी, आणि प्रत्येक व्यक्त आणि अव्यक्त गोष्टीसाठी.  English मध्ये सांगायचं झालं तर,

         “Really Very Thank You Sir for Everything.”

 
आपलाच विद्यार्थी,
अमेय विलास महाडदळकर.
(Batch: UNIX २०१८, SDK २०१९)


स्वप्नाली बाळासाहेब पाटील

WinRT 2019

|| श्री ||

सन्माननीय सर,

     सर्वप्रथम नमस्कार, खरं तर मी तुमच्याविषयी माझ्या मित्राकडून ऐकलं आणि तुमचे youtube वरचे video पाहिले. पण तोपर्यंत UNIX-२०१८ ची batch सुरु झाली होती आणि मी उशीर केला होता. कारण मी जे काही त्या विडिओ मध्ये पाहिलं ते सार स्वप्नवत होतं.

     कसं कुणी आपलं यश-अपयश, चुका, त्यांवरचे मार्ग इतकं खुलेआम बोलू शकतं. कसं कुणी आमच्यात बसून आमच्यापैकीच आपण आहेत, हे करू शकतं. खरंच पटत नव्हतं, कारण आयुष्यात कुणीतरी असं भरभरून देणारं भेटेल, असं कधीच वाटलं नव्हतं, आणि तुम्ही भेटलात सर.

     खरतरं काही गोष्टी या शब्दात सामावत नाहीत, पण तरी माझ्या भावना व्यक्त करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. काही ओळींमध्ये आपला उल्लेख एकेरी झाला असेल, त्याबद्दल माफी असावी.

गीत तेच चाल निराळी,
गंध संस्कृतीचे दरवळत जाई,
ज्ञानामृताची जिथे रोषणाई,
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

असंख्य दिवे उजळीत जाई,
संस्कारांची सरिताही वाही,
ज्ञानोत्सवांची जणू पंढरी ही,
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

कलागुणांची मैफिल साजरी,
जगण्यास मिळे नवी उभारी,
हर पैलूची कथा आगळी,
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

आभाळाची मिळे सावली,
कधी गरजली कधी बरसली,
दातृत्वाची गोष्ट ही न्यारी
गुरु लाभला आम्हा ऐसा काही.

धन्यवाद सर.

आपली विद्यार्थिनी,
स्वप्नाली पाटील
(२५-११-२०१९)


From Grateful Parents

Dear Madam/Sir

Jai Gurudev!
 
This is a thanks giving to a person who is by real means a GURU. There are plenty of teachers around, but not all are Vijay sir the real Guru.
Our only son was totally a lost and depressed child when he did not perform well in his BCS course. For him his life/his years were wasted and hopes lost.  For us we had lost our beloved boy. 
But after meeting Vijay sir, there was a positive impact, a wonderful influence on him. Sir has empowered him to chase his dreams. The subject he hated most are now challenging and developing curiosity in him. 
He has been motivated by Sir to be a life long learner. His way of looking towards his own life has totally changed. Our son has changed into a more responsible, caring and a focused person now.
He is blessed to have a Guru like Vijay sir. The power of every word and action of Sir has changed our son. Sir has made a great difference in his life. 
From the bottom of our heart we thank you Vijay sir for bringing back the lost happiness in our lives and a heartfull thanks from a mother who says,” I have got my son back “
 
 
A never ending Thank you 
from grateful parents -Rahane’s


Omkar Langhe

WinRT 2018, UNIX 2018
 

माझं नाव Omkar Langhe , नुकताच passout झालोय आणि एका company मध्ये internship करत आहे .मी सरांन ला SDK 2018 Batch मध्ये पाहिलं. तस सर बद्दल बरच काही ऐकल होत पण class लावायचा विचार कधी आला न्हवता.

सरांन कडे येण्या आधी मी सरांनचे एक विद्यार्थी Jeetendra Sir कडे C-DS-C++ शिकत होतो. Jeetendra Sir कडे शिकत असताना मला जाणवलं की आपण जे C/C++ शिकलो ते काहीच नव्हतं.

Jeetendra Sir कडे batch संपली आणि मला programs जमायला लागले, पूर्वी सारखी programming ची भीती कमी झाली. मला हळू हळू जाणवायला लागल की मी जे समजत होतो की – “MALA C YETA, DS YETA, C++ YETA” ह्यातल काहीच येत नव्हतं. म्हणजेच CANCER झ्हाला होता. 
अश्या प्रकारच्या Cancer ची treatment करायची म्हणून मग मी 19 june 2018 ला SDK batch join केली .Batch मध्ये अधिक संख्या UNIX चा विद्यार्थ्यांची असल्या मुळे मला हा सवाल आला होता “मला हे जमेल का ??” कारण COM ची भीती मी माझा मित्रांकडून ऐकली होती ज्यांने पहिलं सर कडे  SDK केल होत. मग मी सरांनला विचारल की मी UNIX केलं नाही, तेव्हा सर बोलले काही हरकत नाही, SDK कर आणि नंतर UNIX कर.

SDK ला सुरवात झाली आणि Coding चा नवीन प्रवास सुरु झ्हाला .सर ने सांगितलेल Event Driven Architecture, Polymorphism, Compilation kasa hota, आणि बऱ्याच concepts समजायला लागल्या. Pure virtual functions, Interface सांगताना Rajesh Pradhan च example आता मी कधीच विसरणार नाही. Win 32 शिकत असताना सगळं मस्त वाटत होत. Assignments पण KADAK होत होत्या आणि मग जेव्हा COM आलं , तेव्हा हळू हळू तेचे चटके बसायला लागले (TO BE VERY HONEST).

COM चालू असताना C++ चा बऱ्याच  concepts समजायला लागल्या e.g. pure virtual functions, abstract classes, pure virtual base class, interface, classes, objects, polymorphism, Inheritance, etc. चांगल समजले. COM ला सगळे का अवघड म्हणतात ते Aggregation आणि Automation चा flow आल्या वर समजलं . Automation करताना खूप त्रास झाला. Automation चा flow मी 2-3 वेळा करून सुद्धा run होत न्हवता तेव्हा एका क्षणी give up करायचा विचार आला होता. पण Run तर करायचाच होत.

Notes वाचत, Recordings ऐकत ऐकत परत एकदा Automation ला try दिला. सांगितल्या सारखे सगळे configurations केले. आता वाटलं मस्त कडक Run होणार automation आपलं, पण तो काय run झाला  नाही.

अश्या वेळेस एवढे प्रयत्न करून सुद्धा Success मिळत नाही, तेचे frustration मला जणू लागल. खूप वेळा असं वाटलं की मी सगळं बरोबर केलय तरी का होत नाही, तेव्हा सर ने सांगितलेले “तो कधीच चुकत नाही” हे आठवायचं. मग खूप प्रयत्न केल्या नंतर मी माझा एका मित्रा ला सांगितलं माझं  automation रन होत नाही म्हणून. सगळं बरोबर वाटत आहे. सांगता सांगता एक configuration केलं आहे का त्याने विचारले. आणि मी ते configuration केलं न्हवत. रात्री घरी आल्यावर ते configuration केलं आणि माझा पहिला client आणि दुसरा IDispatch चा client Run झाला. तो run झाला आणि समाधान जाणवलं, आणि तोंडावर एक smile आली. आणि परत एकदा सिद्ध झालं “तो कधीच चुकत नाही “, प्रत्येक वेळेस आपणच चुकतो. Automation नंतर pending असलेल्या SDK project ला सुरवात केली. Automation ने माझा मध्ये काही test केलं असेल तर मात्र माझे Patience.

COM चे assignments successfully केल्या नंतर मला बाकी assignments आणि project करताना काही अवघड वाटल नाही. आणि मी SDK 2018 batch चे सगळे assignments आणि project successfully complete केले.

SDK ने मला काही गोष्टी शिकवल्या, coding चा hands-on experience, patience आणि computer sathi Respect.
COM मधे coding केल्यावर coding करायचा confidence आला.

सरांन कडे शिकत असताना सरांचे Principles शिकलो आणि आता मी ते follow करण्याचा प्रयत्न करत आहे, ते म्हणजे:

1.   Do One Thing, Do it Well,

2.   माझा सगळ्यात आवडता principle, “क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.” (Let your code speak),

3.   Never Forget the basics,

4.   जे करा, वेड्या सारख करा

आणि सगळ्यात महत्वाचं books कश्या वाचायचा ते समजल.

आता UNIX ला admission घेतल आहे आणि अजून खूप काही शिकायचं ठरवलंय. SDK चा बऱ्याच concepts इथे Map होयला लागल्यात. 
असो अधिक काय बोलणे..असं बरच काही आहे सरांन बद्दल सांगण्या सारखं ,अर्धविराम देतो आहे..!

LOVE YOU SIR AND ALL ASTROMEDICOMP FAMILY


योगेश भरत जाधव

WinRT 2016, UNIX 2016, RTR 2017, RTR 2018 – as a Group Leader, RTR 2021 – as a Group Leader

पंढरीचे भूत मोठे..

पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||

“ बाळ्या तू करणारेस का तो OpenGL चा क्लास, नवीनच सुरु होतोय तो ?”

“ हो मला वाटतंय करावा, कारण आपण तसंही काही करत नाही, सरांसोबत करू काहीतरी. “

“मला नको वाटतोय रे! अधीच UNIX चालूये त्यात फी पण एवढी ठेवलीये. जाऊदे नकोच. ”

“करू रे फी चं काहीतरी, ते  होईल हळू हळू.”

असं हो नाही करत करत आमचं OpenGL  सुरु झालं. त्याला नाव सरांनी ‘Real Time Rendering(RTR)’ असं दिलं होतं. काय असतं  हे OpenGL ? कशाशी खातात ? हे तितकंसं माहित नव्हतं. सरांचे Animation असलेले demo तेवढे बघितले होते याआधी. काहीतरी भारी असेल असं वाटत होतं पण थोडी धाकधूक होतीच. विश्वास आणि आधार एकच होता सर. क्लास सुरु झाला, एक दिवस सरांनी फक्त movies ची नावं आणि music albums ची यादीच सांगितली, आणि सांगितलं ‘हे सगळं पुढच्या १ वर्षात बघायचं आणि ऐकायचं, इथून तुमचं खरं शिक्षण सुरु झालं’. जाम खुश झालो म्हटलं काहीतरी कामाचं वाटतंय हे. सर म्हणायचे, ज्यांना coding  शिकायचंय त्यांना हा क्लास उत्तम आहे, माहित नव्हतं आम्हाला कितपत जमेल. सर अस पण बोलले होते, ‘क्लास १ वर्षाचा असेल आणि प्रत्येक महिन्यातले दोन शनिवार रविवार होईल’,’job guarantee नाही, झालंच तर असलेला जॉब जाण्याची शक्यता जास्त’. ‘कोर्स खूप rigorous असेल. don’t take this lightly’, ‘आज पर्यंतच्या माझ्या सगळ्या क्लास पेक्षा हा क्लास वेगळा असणारे, ह्याची fee पण वेगळी आहे, लग्न झालेले सावधान, सोडचिट्ठीची तयारी ठेवा’, इथपर्यंत सगळं ऐकून झालेलं. असे खूप काही उपदेशाचे डोस पाजून सरांनी क्लास ला सुरुवात केली, ९६ जण आलेले. कसं काय माहित पण सरांकडे बघून वाटायचं नक्की की सरांनी खूप मोठं शिवधनुष्य हाती घेतलं आहे, आणि आपण त्याचे पहिले साक्षीदार आहोत. मैफिलीतला गायक एखादा राग सादर करण्यापूर्वी असतो तसा भास व्हायचा. वेगळं म्हणजे ह्यावेळी सरांनी मॅडम ना समोर आणून बसवलं होतं, विद्यार्थी म्हणून, त्यांचा उत्साह तर केवळ अवर्णनीयच. तसे सर बोलले होते सुरवातीला, ‘महिन्यातले चार शनिवार रविवार माझ्या फॅमिलीचे होते, आता त्यातले दोन तुम्हाला देतो. पण हळू हळू लक्षात आलं, सरांनी ते सगळेच शनिवार रविवार आम्हाला दिले आणि आपल्या फॅमिलीलाच आमच्यात आणून बसवलं.

प्रत्येक weekend एक नवी गोष्ट घेऊन येत होता, Windows वर windowing  सुरु झालं होतं. अचानक सरांच्या डोक्यात विद्यार्थ्यांचे groups पाडून प्रत्येक group ला एक group leader ठरवून द्यायचं आलं होतं. ते group  leaders आमच्याकडून जातीने सगळ्या assignments करून घेतील. मग अभ्यास,संस्कार आणि OpenGL सुरु झालं. अजूनही आठवतं Windowing करता करता OpenGL मध्ये जाणारा bridge सरांनी, ऋतुसंधीकालाचं उदाहरण देऊन इतका सुंदर सांगितला होता, की मी सगळ्या code मध्ये त्या call च्या आधी ‘Bridge to connect OpenGL’ अशी comment लिहिली होती. Windowing नंतर Full Screen चा code सरांनी वर्गात अचानक शिकवला. हातात बघायला code नाही, सगळं काही स्वतः imagine करून लिहायचं होतं. वर्गात code झाला, क्लास सुटला, सगळ्यांचं धाबं दणाणलं होतं. तसा थोडा overdose च झाला होता. पण डॉक्टर होतेच सोबतीला. लवकरच त्याचा antidose दिला गेला, परत परत शिकवून. पण त्या एका झलकीत आम्ही जमिनीवर आलो. पुढं काय वाढून ठेवलंय याचा अंदाज आला. हळू हळू एक एक concept संपत होती, एक एक assignment मिळत होती. आता आम्ही dot, line ,triangle, square, color असे basic shapes code नी काढायला शिकलो होतो.

आणि तेवढ्यात मॅडम नी सांगितलं सरांचा पन्नासावा वाढदिवस येतोय ३० सप्टेंबर २०१७ च्या दसऱ्याला, तिथीनुसार. त्यावेळी प्रत्येक group नी एक छोटा प्रोजेक्ट, present करायचा होता, सरांना वाढदिवसाची भेट म्हणून. मग काय, उत्साहात सुरु झाले सगळे. त्याआधी काही जणांनी छोटे छोटे demo आजपर्यंत शिकवल्या गेलेल्या गोष्टींवर बनवले होते . त्याचं एक छोटं प्रदर्शन वर्गात झालं होतं, विशेष म्हणजे त्यामध्ये मॅडम नी सुद्धा एक demo बनवला होता. जे बघून खूप जण भानावर आले आणि आपणही काहीतरी करायला पाहिजे ही भावना जन्माला येऊ लागली होती. अशा सगळ्या लोकांसाठी हा group project ही आयती चालून आलेली संधी होती. मग groups च्या मीटिंग सुरु झाल्या, विषय ठरले जात होते. काही दिवसात हळू हळू सगळ्यांचे projects आकार घ्यायला लागले होते. सरांचा वाढदिवस म्हणून आम्ही सगळ्या groups नी तसेच काही विषय निवडले होते. आमचा विषय होता सरांचे यशस्वी होण्याचे पाच नियम. आमची धावपळ चालली होती आणि प्रत्येक दिवसागणिक उत्सुकता ताणली जात होती, कारण हे सगळं जे चाललं होतं ते सरांपासून लपवून, त्यांना surprise देण्यासाठी.

बहू खेचरीचे रान | बघ हे वेडे होय मन ||

शेवटी तो बहुप्रतीक्षित दिवस आला. त्यादिवशी सगळे जण पारंपारिक वेशभूषेत होते. सरांच्या स्वागताची तयारी झाली होती. सर वर्गात आले, त्यांची खुर्ची त्यांच्या जागेवर नव्हती, ती प्रेक्षकांमध्ये ठेवण्यात आलेली होती, फळ्याच्या वर screen लावली होती. सर थोडे अचंबित झाले असावेत पण त्यांच्यातला कसलेला नट ते चेहऱ्यावर दाखवत नव्हता. एक एक project चं  सादरीकरण झालं. सर कौतुकाने बघत होते, ‘वा वाह’ करून दाद देत होते, टाळ्याही वाजवत होते. पण खोल आत मात्र काहीतरी जन्माला येत होतं. आमचा एकंदर उत्साह आणि आम्ही केलेलं काम बघून सर भारावून वगैरे गेले असावेत, कारण नंतर सरांनी आपल्या भाषणात आमचं खूप भरभरून कौतुक केलं. नंतर त्यांची लाडकी हरिवंशराय बच्चन यांची ‘बुद्ध और नाचघर’ ही कविता म्हणून दाखवली आणि आम्हाला नाटकातले सर बघायला मिळाले. ते दिवस एकदम भारलेले आणि भारावलेले होते. आपल्या कोर्सचं एकदम सार्थक वगैरे झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं होतं. सर मात्र नेहमीप्रमाणे शांतच होते. पुढं काय येऊ घातलंय याचा केवळ त्यांनाच अंदाज होता. कारण आता सुरु होणार होतं ‘Programmable  Pipeline’

जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी |

Programmable  Pipeline, सर सुरवातीपासून बोलत होते अवघड आहे, एकदा घसरलात की सावरणं अवघड आहे. आणि खूप नाही पण आम्ही गाफील होतो. कारण तोवर ‘Fixed  Function Pipeline’ हातात बसलं होतं, त्यामुळे वाटलं की असं काय असणारे वेगळं अजून, पण .. पण .. Programmable pipeline येऊन आदळलंच. code चा आवाका वाढला, assignments चा भडीमार सुरु झाला. बरेच जण धापा टाकू लागले. काहींनी सरळ क्लास ला राम राम ठोकला (अर्थात बरीच वेगवेगळी करणं देऊन). हे आपल्याच्यानी होणार नाही असं लोकांना वाटू लागलं होतं. आणि क्लास गडगडू लागला. बरेच जण वर्गात सरांना आरपार पाहू लागले.  सर मात्र अजूनही खंबीरच होते. सर्वाना धीर देत होते, घसरलेल्यांना सावरत होते. group leaders ना हाताशी धरत होते. हळू हळू सगळे मार्गावर यायला लागले. जे गेले ते कायमचेच गेले, नंतर क्लास कडे फिरकले पण नाहीत. पण जे टिकले आणि करत राहिले त्यांनी मात्र चमत्कार केले. हळू हळू मोठे codes हाताळायची सवय लागली, एका एका error साठी २-२ दिवस घालवायची तयारी झाली. कामाचा व्याप वाढलेलाच होता मात्र त्याची आता सवय झाली. मग आम्ही सगळ्या assignments android वर केल्या, web वर केल्या, mac ,iPhone, linux  सगळीकडे केल्या. assignments बघून तरी वाटायचं आपल्याला जमतंय काहीतरी. दरम्यान एका वर्षात संपणारा कोर्स दीड वर्षावर गेला. ६ महिने वगैरे राहिले असताना सरांनी वर्गात घोषणा दिली, “जसं माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला थक्क केलंत, तसंच surprise द्यायची वेळ आता आली आहे, कुणाला? जगाला !!! जगाला कळू द्या की पुण्यात असा एक क्लास आहे जो सगळ्यांना अवघड वाटणारा विषय मन लावून शिकतोय आणि त्यामध्ये चमत्कार करून दाखवतोय, उत्तम संस्कार सोबत घेऊन.”

तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनी ||

सर बोलले आणि परत क्लास मध्ये गदारोळ सुरु, सगळ्या groups च्या meetings सुरु झाल्या, विषय ठरले जाऊ लागले. हा project म्हणजे एक अवघड काम होतं कारण तो Programmable  Pipeline मध्ये करायचा होता. सगळ्यांचे विषय ठरले, सरांनी नेहमीप्रमाणे deadlines दिल्या. विशेष म्हणजे हा क्लास कधी संपणारे- मुळात संपणारे की नाही- आणि हा event होणार कधी हे कुणालाच स्पष्ट नव्हतं. तरी सगळ्यांनी उत्साहात सुरुवात केली होती. आणि लक्षात आलं, सीतेच्या स्वयंवरात शिवधनुष्य उचलायला गेला आणि तो अंगावर पाडून घेतला, असा रावण झालाय आपला. एक तर हे असं groups नि एकत्र बसून काहीतरी करणं हे सरांच्या स्वभावात नव्हतं आणि त्यामुळं ते क्लास च्या संस्कारातही नव्हतं. बरं coordination हा मुद्दा जरी वगळला तरी महत्वाचा मुद्दा होताच, अंगावर येणारा code. कारण सरांच्या assignments , copy type करायच्या असल्याने तो code आमच्याकडे होता पण आता जर वेगळं काहीतरी स्वतःहून करायचं ठरलं तर पुस्तके उघडून वाचायची गरज होती, आणि मग एक नवीन शिक्षण सुरु झालं.तिथं परत धडपडणं,जमणं, न जमणं सुरु झालं. आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याची कसोटी लागत होती. शिवाय सरांचं शिकवणं आणि assignments चा सपाटा चालू होताच. ह्यातून मग काहींनी सरळ सांगून टाकलं project मधून आम्हाला वगळा, हे प्रकरण अवघड होत चाललंय. मग group leaders नी उरले सुरले गोळा करून खिंड लढवायला सुरुवात केली. सरांची सक्त ताकीद होती ‘Project च्या कामामुळं assignment राहिल्या हे चालणार नाही. आधी assignments मग project.आधी शिक्षण मग event’. project च्या deadlines जशा जवळ येत होत्या तशी सगळ्यांची जागरणं वाढली. ध्यास होता काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा आणि अविरत कष्ट उपसण्याची तयारी पण होती. ह्या वेडापायी काहींनी नोकऱ्यांना राम राम ठोकला, बाहेरगावच्यांचं घरी जाणं कमी झालं. सरांनी वर्तवलेल्या बऱ्याच शक्यता खऱ्या व्हायला लागल्या होत्या. अर्थात सरांसकट सगळेच झपाटले गेले होते. त्रास होताच पण तो प्रसूतीचा होता. सगळ्याच groups मध्ये अशी परिस्थिती होती, काही जण डेंग्यू मधून उठून काम करत होते, कुणी आपली लहान मुले सांभाळत करत होते , कुणी हॉस्पिटल मधून काम करतंय, कुणाचे वडील गेल्याची बातमी देखील याच काळात आली. भावभावनांचे कल्लोळ सगळीकडूनच उठत होते, एकमेकांना धीर देत,सांभाळत सगळेजण वाट चालत होते. आता मात्र सगळे group एकमेकांशी घट्ट बांधले गेले होते. एक मात्र खरं, ध्येयवेड्या (खरं तर वेड्याच!) मास्तर नी आपल्या विद्यार्थ्यांना पण कामाचं वेड लावलं होतं. अर्थात ही तपश्चर्या ज्यांना जमली त्यांनाच वेदनेतून कळणारा वेदांचा अर्थ जाणवला.

अशाच सगळ्या धावपळीत तो दिवस आला, तो होता ३० सप्टेंबर २०१८, मागच्या वर्षी ह्याच दिवशी सरांच्या मनात जन्माला आलेली कल्पना आज बरोबर एक वर्षानी मूर्त रूप घेऊन आली होती. एक एक करत सगळ्या projects चं प्रदर्शन झालं. टाळ्यांच्या गजरात आमच्या दीड वर्षाच्या कष्टाला दुजोरा दिला जात होता. बाकी groups चे demo बघून अजून आपलं काय काय करायचं राहिलं आहे हे कळत होतं.  एकीकडे आपण केलेल्या कष्टाची पावती मिळत होती तर दुसरीकडे अजून काय काय करायचं बाकी आहे हे लक्षात येत होतं. प्रत्येकाचीच अवस्था event च्या शेवटी आम्ही म्हटलेल्या श्लोकातील वर्णनाप्रमाणे झाली होती. संपुर्णातून काहीसा अपूर्णतेचा अनुभव.

ॐ पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते |पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||

क्लास  संपला. मला भयानक रिकामपण यायला लागलं होतं. facebook आणि watsapp वरचे लोकांचे status आणि त्यातून दिसणारी त्यांची ‘Pretending life’ बघून तर जास्तच भीती वाटत होती, आपणही असेच होऊन जाऊ काही दिवसात. क्लास परत करण्याची सरांची युक्ती पण ह्यावेळी वेगळी होती, “फक्त group leader बनूनच क्लास repeat करता येईल आणि प्रत्येक lecture ला attendence compulsory.” पुन्हा पुढचं दीड वर्ष!! आलेल्या रिकामपणावर हा जबरदस्त उपाय होता पण आता जबाबदारी जास्त होती, आणि घर ? त्याकडे तर मागचे दीड वर्ष दुर्लक्षच झालं होतं. मग सगळ्यांशी चर्चा सुरु झाल्या, सगळ्यांनीच वेड्यात काढलं, ‘वेडा झालास का?’,’किती दिवस नुसताच क्लास करणार?’ इथपासून ते ‘लग्नबिग्न करायचंय का नाही, म्हातारा होऊन जाशील’ इथपर्यंत सगळं ऐकून झालं. पण का काय माहित जितका विरोध होत होता तितकाच माझा निर्णय पक्का होत होता, आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्यात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं माझं घर, माझी फॅमिली, आई वडील. शेवटी त्यादिवशी रात्री २ वाजता बाळ्याला message केला, “माझा निर्णय झालाय..”

तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||

– योगेश


Suvrat Apte

SDK 2016, UNIX 2016, RTR 2017

प्रिय, आदरणीय, सर,
Computer Fundamentals चं सेमिनार केलं आणि एके काळी “मी Windows वगैरे असल्या गोष्टी वापरत नाही. मी Linux user आहे.”, असं म्हणणाऱ्या मी, डोळे मिटून Win32 च्या class ला admission घेतली. Cancer cell असल्याची जाणीव झाली होती; अजून आहे. खरं सांगायचं तर computer क्षेत्र हे पाश्चात्य असल्यामुळे या क्षेत्रात कोणी “गुरू” असेल अशी अपेक्षा तर सोडाच, कल्पना पण केली नव्हती. पहिल्या दिवशी class ला आलो. भारतीय बैठक. मुलं गर्दी करून मांडी घालून बसलेली. हे दृश्य सवाई गंधर्वच्या भारतीय बैठकीसारखा वाटलं. समोर एखाद्या कलाकाराचा solo होईल एवढी जागा सुद्धा होती. इथे सर computer कसा काय शिकवतात हे काही केल्या कळत नव्हतं. पाहिलं lecture संपलं तेव्हा कळलं की इथे सर computer शिकवायचा solo च सादर करतात. पहिली 3 lectures झाली आणि computer मध्ये गुरु मिळाल्याचं फार मोठं समाधान मिळालं; MS करायचा plan cancel झाला. भारतीय शिक्षण पद्धती ला नावं ठेवणारे खूप लोक पाहिले होते (मी सुद्धा त्यातलाच एक), पण ती शिक्षण पद्धती सुधारचयचा प्रयत्न करणारा माणूस मात्र पहिल्यांदाच पहिला. सध्या जर मला कोणी विचारलं कि “MS करायचा काही plan नाही का?”, तर मी सांगतो, “बाजीराव रोडला एक one man university आहे, तिथे MS करायचा plan आहे”.
पण सर, माझ्या इतर गुरुंमध्ये आणि तुमच्यामध्ये एक खूप मोठा फरक आहे. बाकी गुरूंनी मला बरयापैकी advanced level चं यायला लागल्यावरच accept केलं. तुम्ही मात्र आम्हा सर्वांना जसे आहोत तसे accept करता. त्यामुळे तुमच्याच कडे grooming आणि तुमच्याच हाताखाली advanced training असं एक unique combination होतं. जगामध्ये असं दुसरीकडे कुठे होत असेल असा नाही वाटत. तुमच्या मुळे माझी computer कडे बघायची दृष्टी पूर्ण पणे बदलली. Computer कडे एक “सजीव” म्हणून बघायला तुम्ही शिकवलंत. त्याला त्रास नं देता programming करावं हा विचारच नव्हता केला कधी. Programming ही एक कला आहे हेही तुम्हीचं शिकवलंत. आता जेव्हा मी “अल्लाउद्दीन खान”, “रवी शंकर”, “झाकीर हुसेन” हे लोक १८-१८ तास रियाझ करायचे असं ऐकतो, तेव्हा, “आमचे गोखले सर सुद्धा २० तास computer चा रियाझ करतात” हि गोष्ट मनात आल्याशिवाय राहात नाही. तुमच्या मुळेच मला programming च्या रियाजाची गोडी लागली व तबल्या प्रमाणेच computer उघडताना त्याला नमस्कार करून उघडायची सवय झाली. सर, Win32 चा class संपल्यावर मी माझ्या तबल्या च्या group मधल्या मित्रांना म्हणत होतो, “सर म्हणजे माझ्यासाठी computer मधले झाकीरभाई आहेत.”. पण UNIX ची बॅच झाल्यावर मात्र “सर computer मधले झाकीरभाई आहेत” का “झाकीरभाई तबल्यातले गोखले सर आहेत” असा प्रश्न पडला आहे!

ऑफिस मध्ये तुमच्या बद्दल सांगितल्यावर माझा एक मित्र खूप छान वाक्य बोलला होता, त्याने शेवट करतो. “बाबा आमटेंनी जसं “आनंद वनात” कुष्ठ रोग्यांना बरं केलं, तसंच गोखले सर “आनंद आश्रमामध्ये” technical कुष्ठ रोग्यांना बरं करत आहेत!”
सर, आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मागच्या जन्मात नक्कीच खूप चांगलं काहीतरी केलं असलं पाहिजे. म्हणूनच आम्हाला तुमच्यासारखा गुरु मिळाला!


Abhijeet Deshmukh

UNIX 2016

माझे नाव अभिजीत देशमुख. 8+ वर्षांचा Experience. तुमचा विद्यार्थी होण्याचे भाग्य Feb-2008 मध्ये Sunbeam,Pune येथे DAC ला असताना मिळाले. ज्ञानाची गोडी तुमच्या कडून शिकायला मिळाली.
Job मिळाल्यानंतर मित्र व नातेवाईक जे B.E. passout होऊन job शोधात होते त्यांना तुमच्या बद्दल व Sunbeam बद्दल सांगुन DAC ला ऍडमिशन घेण्यासाठी मदत केली. उद्देश एकाच होता कि त्यांनी तुमचे विद्यार्थी होऊन ज्ञानार्थी व्हावे.
असे जवळपास ५-६ जणांनी मग DAC ला admission घेतले व आज ते सर्व Well settled आहेत. ऑफिस मध्ये काम करताना शिक्षण क्षेत्राशी संबंध राहावा म्हणून Pune University साठी “External Examiner” म्हणून पण काम करतोय.
“External Examiner” म्हणून काम करताना बऱ्याच Colleges ला भेट दिली. तेव्हा एक गोष्ट लक्ष्यात आली कि Industry ला अपेक्षित असे विद्यार्थ्यांचे knowledge आणि विद्यार्थ्याला असलेल्या knowledge या मध्ये खूप तफावत आहे. Colleges म्हणजे concentration camp हे अनुभवले. हि स्थिती पुण्यातील colleges ची. पुण्याच्या बाहेरील colleges ची स्थिती न सांगण्यासारखीच. हि परिस्थिती पाहून मनात चलबिचल सुरु झाली कि अशी परस्थिती बदलण्यासाठी आपण थोडा तरी काडीचा हातभार लावावा. पण कसे ते कळत नव्हते. पैसे केवळ donate करून आपले समाजाप्रतीचे कर्तव्य पूर्ण होत नाही हे एव्हाना समजले होते. अश्या पारिस्थितीत तुमच्या Unix,2016 च्या class ची date समजली व class join करायचे ठरवले. सोबत चुलत भाऊ हर्षद (MCA – 1st Year, MIT Kothrud ) व मित्र वैभव झोडगे यांना विचारले आणि आम्ही तिघांनी class join केला.
Unix class ला आल्यावर जस जसे तुमचे विचार कानावर पडू लागले तस तसे मन शांत होऊ लागले. Unix ची व्याप्ती पाहून Computer ची नव्याने ओळख होऊ लागली. Fundamental गोष्टीचे ज्ञान मिळत असताना ते केवळ आपल्या पुरते मर्यादित न ठेवता ते इतराना हि दिले पाहिजे असा विचार मनात सुरु झाला. जेव्हा तुम्ही सांगितले कि शिक्षक व्हा तेव्हा पक्के केले कि आपण पण शिक्षक होऊन ज्ञानाचा प्रचार केला पाहिजे व त्या दृष्टीने सुरवात केली. Office मध्ये जे विद्यार्थी नवीन join होऊन support चे काम हेच सर्वस्व मानू लागले त्यांना coding चे महत्व पटवून development project कडे वळवायला सुरवात केली. त्या मधील बऱ्याच जणांनी आता coding ला सुरवात केली आहे. तुम्ही दिलेल्या प्रेरणेतुन अजून एक विचार मनात आला कि “Computer Fundamental” चे session घ्यायचे ते पण थेट दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी, कुठलेही शुल्क न घेता.
“Computer Fundamental” session चे content बनविले व त्यासाठी तुम्ही घेतलेला seminar चा आधार घेतला. दहावीचा वर्ग जाणीव पूर्वक निवडला. कारण कोवळ्या मनावर चांगले संस्कार झाले तर त्याचा परिणाम हा अधिक चांगला असेन असे वाटले. दहावीच्या विद्यार्थ्यांना Computer सारखा विषय केवळ File create करण्यापुरता मर्यादित ठेवला तर त्यांना त्या विषयाची गोडी लागणार नाही. पण जर त्यांना थोडे जास्त knowledge दिले तर ते त्या विषयाचा आनंद घेऊन शिकू शकतील अशी अशा वाटत आहे.
असे session, 22 मे, 2017 ला ज्या शाळेत मी शिकलो त्या बीड शहरातील “चंपावती विद्यालय” मध्ये घेतले. Summer vacation साठी आलेली 60-70 विद्यार्थी व 5 शिक्षक (जे माझेही शिक्षक होते) अशा जनसमुदाया समोर शिकवायला सुरवात केली. Session च्या सुरवातीला Lord Macaulay चे सन 1835 मधील भारतीय शिक्षण व्यवस्थेवर विचार सांगून session मराठी मध्ये घेण्याचे कारण सांगितले. Human body चे व Computer चे interrelation कसे आहे, मानवी पंचेंद्रिये व Computer चे input devices सारखे कसे आहेत, मेंदू मधील nervous system ला व computer ला current च का लागतो असे एक एक मुद्दे सांगत गेलो. जस जसे session पुढे जात होते तस तसे विद्यार्थ्यांचे चेहरे अधिक बोलके होऊ लागले. “Knowledge is inter-related” हे सांगायला विसरलो नाही. जेव्हा microprocessor मधील pins ह्या सोन्याच्या असतात हे सांगितले तेव्हा विद्यार्थ्यांचे डोळे वेगळेच चमकले. विद्यार्थ्यांचा खूप छान response मिळाला. Session ला बसलेल्या एका शिक्षकाची प्रतिक्रिया बोलकी होती. ते म्हणाले कि “आज परेंत computer हे फक्त machine म्हणून पाहत होतो आता त्याला मनुष्य म्हणून पण पाहीन.” शिकवण्याचे समाधान तेव्हा अनुभवले.
हे सगळे शक्य झाले ते केवळ तुम्ही केलेल्या संस्कारामुळे. ह्या पुढेही जसे जमेल तसे असे session घेत राहण्याचा मानस आहे. त्यासाठी गरज आहे ती फक्त तुमच्या आशिर्वादाची व मार्गदर्शनाची..!!