WinRT 2016, UNIX 2016, RTR 2017, RTR 2018 – as a Group Leader, RTR 2021 – as a Group Leader
आज काय नाही, AstroMediComp कडे
आज काय नाही, AstroMediComp कडे ?
बसायला एक वर्ग आहे,
टाकायला दोन तीन सतरंज्या आहेत,
एक गंजलेली खुर्ची आहे आणि
शिकवायला एक मास्तर आहे
आज काय नाही, AstroMediComp कडे ?
एक मोठासा कॅमेरा आहे,
जो टिपतोय सगळ्या
वसुंधरेच्या हालचाली
घडणाऱ्या आणि बिघडणाऱ्याही.
तसा एक कॉफी चा मळाही आहे,
जिथं कॉफी बनते आणि बरं का!
एक छोटंसं कॅफे पण आहे,
त्याच कॉफी चा आस्वाद घेण्यासाठी.
आज काय नाही, AstroMediComp कडे ?
एक छोटंसं मोरपीस आहे,
साक्षात श्रीकृष्णाच्या मुकुटातलं,
नुकतंच ते निघालंय,
मीरेच्या हाकेला ओ द्यायला
कालिदासाने पाठवलेला मेघ,
आमच्याकडे आलाय,
म्हणतोय अजूनही यक्षिणी विरहात आहे,
संदेश अजूनही पोहोचलाच नाही.
आज काय नाही, AstroMediComp कडे ?
चक्क! एक अणुबॉम्ब सुद्धा आहे,
आम्ही तो जपून ठेवलाय,
जुन्या पराक्रमांची आठवण म्हणून.
शिवाय अणुरेणूत बसलेला प्रभू श्री रामही इथेच आहे,
लाडक्या सीतेसोबत लग्न करायला आला आहे,
चला त्या सोहळ्याला हजेरी लावू या.
आकाशाशी धरणीचं नातं बांधूया…
इन्कलाबी भगतसिंग सुद्धा इथे आहे,
फाशीच्या तख्तापर्यंत चालला आहे,
साऱ्या देशाला जागे करतो आहे,
एक दिवा आज सूर्याला वाट दाखवत आहे.
fantasy चं तर खूप मोठं जग इथे आहे.
साक्षात हॅरी पॉटर चं Hogwards,
तिकडे जाण्याची ट्रेन आणि
त्यांचं खेळाचं मैदान,
सगळीच जादुई दुनिया इथेच आहे
आणि एक जंगल आहे,
मानवी मर्त्य जगापासून दूर,
निसर्गाचं स्वतःच गुपित जपणारं
रात्रंदिवस उजळणारं.
आणि एक ड्रोन पण आहे,
परग्रहावर जाऊन चाचण्या करण्यासाठी,
त्याचा होकार ही दुसऱ्या जगाची सुरुवात असेल
आणि एक स्वप्न आहे,
पाण्यामधल्या जगाचं दर्शन घडवणारं,
त्यातच कुठेतरी शेषशायी विष्णु ,
शांतपणे पहुडला आहे.
सगळ्याच छान छान गोष्टी नाहीत बरं इथे!
आमच्याच सीमेच्या थोडंसं पार,
एक शहर आहे ‘Paradise City’
उधर सब ‘अच्छे’ लोग रेहते है,
आणि आमच्यामधली दरी आता ,
हळू हळू सांधत चालली आहे
इथे काही आतंकवादी आहेत,
सतत दंगली घडवत आहेत,
सर्वसामान्य लोकांच्या जाणीवा,
बोथट करून देत आहे
अजून काय नाही आमच्याकडे?
शहराच्या मध्यभागी एक घर आहे,
त्या घरातली एकटी आई सुद्धा
आमच्याकडे आहे, ती मूकपणे पुकारतीये,
तिच्या चिमण्यांना परत फिरण्यासाठी.
त्याच शहराच्या दुसऱ्या टोकाला,
राज कपूर च्या आठवणींनी भरलेलं,
धुळ खाणारं RK Studio आहे,
म्हणे त्याला विकायला काढलंय,
आणि स्वर्गातूनही बोली लावली जातेय
इतकं सारं वेगवेगळं भरून ठेवलेल्या आमच्या घरात,
शेवटी सारे नवरस एकवटले आहेत,
त्यांच्या असण्यातून किंवा नसण्यातून,
एक शांतता प्रस्थापित झाली आहे,
तिमिरातुन तेजाकडे जाणारी वाटचाल
सुरु झाली आहे.
इतकं सगळं असूनही
आज काही नाही, AstroMediComp कडे.
बसायला एक वर्ग आहे,
टाकायला दोन तीन सतरंज्या आहेत,
एक गंजलेली खुर्ची आहे आणि
शिकवायला एक मास्तर आहे
– योगेश