News

एक अनोखी सभा

तारीख: 16 फेब्रुवारी 2023        ठिकाण: आनंदाश्रम, पुणे.

गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी आनंदाश्रमात AstroMediComp ची एक अनोखी सभा भरली. या वेळी या सभेला विद्यार्थी, सर, मॅडम आणि ग्रुप लीडर्स तर होतेच पण सोबत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी/इतर सदस्य) ही होते. ज्यांना येत्या RTR बॅच चं ग्रुप लीडर व्हायचं आहे आणि काही कौटुंबिक समस्या आहेत ते व त्यांचे कुटुंबीय या सभेला हजर होते. या अनोख्या सभेला कारण ठरलं, RTR च्या एका विद्यार्थ्याच्या पत्नीचे सर व मॅडम यांना लिहलेले एक पत्र. पत्राचा आशय काही असा होता की, तिला त्याची प्रगती गेले दीड वर्षं दिसत होती, त्याने भावी बॅच मध्ये ग्रुप लीडर व्हायला तिची हरकत नव्हती पण काही समस्या, काही प्रश्न तिला भांबावत होते. या पत्राची दखल घेत सरांनी ह्या व अशा कुटुंबांना भेटायला बोलावलं. सुरुवातीला ग्रुप लीडरच्या जबाबदाऱ्या, या भूमिकेकडून असणाऱ्या सर्वसाधारण अपेक्षा, हे सारं करत असताना त्या विद्यार्थ्याची सर्वांकष होणारी प्रगती यावर सरांनी मार्गदर्शन केले. हे सगळं करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये हे त्यांनी निक्षून सांगितले. ग्रुप लीडर हा फक्त क्लासमधल्या ग्रुपना लीड करत नाही तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही लीडर होतो. त्याच्या कुटुंबाला सांभाळत आयुष्यात येणाऱ्या कमी-जास्त प्रसंगाला सामोरं जाण्याचीच नव्हे तर कुशलतेने त्यातून पार पडण्याची क्षमता या सगळ्या प्रवासात उत्तरोत्तर वाढत जाते असेही सरांनी नमूद केले. त्यानंतर जमलेल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीसोबत त्यांनी संवाद साधला. बऱ्याच जणांच्या वैयक्तिक समस्या समजून घेत त्यावर तोडगा काढण्याचा मार्ग दाखवत सरांनी प्रत्येकाला अंतर्मुख होण्यास मदत केली… वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जात होत्या, संवाद उत्तरोत्तर रंगत होता.. जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. RTR आणि ग्रुप लीडरशिप केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या सक्षम झालेल्या व्यक्तीला भविष्याची चिंता करण्याचं कारण नाही याची ग्वाही सरांच्या संभाषणातून कुटुंबियांना मिळाली.

RTR च्या तिसऱ्या बॅच चे ग्रुप लीडर प्रसन्न पवार व अमित शिंदे यांनी देखील सर्वांशी संवाद साधत शंकानिरसन केले. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या सरांनी आज त्यांच्या नाजूक नात्यांना जपत त्यांच्या कुटुंबियांमध्येही तोच विश्वास निर्माण केला जो त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. विश्वास – कष्ट करून आत्मविश्वासाने स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा!! तर अशी ही अनोखी सभा आनंदाश्रमात आनंदाने पार पडली.

– योगिता फुलसुंदर