गोखले सर

ह.भ.प. डॉ.  गोखले सर : एक बहुआयामी व्यक्तिमत्व

“अष्टावधानी” हे विशेषण कृतीतून खरे करून दाखवणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे  डॉ. विजय गोखले! वैद्यकीय शिक्षण घेतलेला एक धडाडीचा माणूस कर्तृत्वाच्या जोरावर किती क्षेत्रे पादाक्रांत करू शकतो  याचे उत्तम उदाहरण  डॉ. विजय गोखले ! ते ज्या क्षेत्रांत काम करत आलेले आहेत त्यांविषयी ही माहितीची मालिका आहे. त्यांच्या विषयी माहिती सांगण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या पदवीशी विसंगत, असा एक पैलू उलगडत आहे :

संगणक प्रेमी:
१९९७ साली सरांचा संगणकाशी प्रथम परिचय झाला. काळाची गरज म्हणून कर्ज काढून घेतलेला संगणक नंतर आपल्या आयुष्यावर आणि कैक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सखोल परिणाम करणार आहे याची पुसटशी कल्पनासुद्धा तेव्हा सरांना नव्हती. एक डॉक्टर असून त्यांची संगणकाशी ओळख कशी झाली, हे जाणून घेणे रंजक ठरेल. १९९१ पासूनच सर मेडिकलचे क्लासेस घेत होते. १९९२-९३ च्या सुमारास ज्योतिष त्यांच्या आयुष्यात आले. आणि कोणतीही गोष्ट झोकून देऊन करणाऱ्या सरांनी अल्पावधीतच त्यावर प्रभुत्व मिळवले. हाताने कुंडली बनवण्यापेक्षा आपण संगणकाची मदत घेऊन कुंडली का बनवू नये, असा विचार मनात आल्यावर ज्योतिषाचे SOFTWARE बनविण्यासाठी म्हणून ८ एप्रिल १९९७ रोजी पाडव्याच्या शुभ-मुहूर्तावर त्यांनी संगणक घेतला. DOS च्या COMMAND PROMPT पासून त्यांचा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला. संगणकाचे चांगले वापर-कर्ते ( USER ) झाल्यावर संगणक प्रणाली ( SOFTWARE ) लिहिण्यासाठी PROGRAMMING LANGUAGEs शिकणे आवश्यक होते. दैवयोगाने त्यांना पहिले पुस्तक वाचायला मिळाले ते म्हणजे – “The C Programming Language ” by K & R . आता सुरुवातच अशा अवघड समजल्या जाणाऱ्या पुस्तकाने झाल्यामुळे पुढे तशीच पुस्तके वाचायची सवयच जणू जडली. लहानपणापासूनच पुस्तके वश करून घेण्याची विशेष कला त्यांना अवगत होती. मुळात डॉक्टर असल्याने अवघड वाचण्याची, शिकण्याची गोडी लागली होती. संपूर्ण स्वतःचे “ज्योतिष SOFTWARE ” बनवेपर्यंत त्यांनी स्वतःच्या नकळत WINDOWS PROGRAMMING चे सखोल ज्ञान प्राप्त केले होते.

अशातच २००३ साली त्यांनी पहिली WINDOWS PROGRAMMING ची बॅच सुरू केली. त्या वेळी चार विद्यार्थ्यांचे रोपटे असलेला क्लास आज सरांकडून शिकून गेलेल्या आणि शिकत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा वट-वृक्ष झाला आहे. २००४ साली त्यांना त्यांच्या अतुलनीय ज्ञानाची बाहेरच्या जगात असेलेली किंमत सांगणारी एक घटना घडली. सरांच्या मित्राचा भाऊ नलेश पाटणकर पुण्यात कंपनी सुरू करण्याच्या विचारात होता. कंपनीच्या पहिल्या PROJECT बद्दल त्यांनी सरांना कल्पना दिली, आणि विचार करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देऊन काही कामानिमित्त ते बाहेरगावी गेले. हा PROJECT म्हणजे आपल्याला असलेले एक आव्हान आहे असे समजून अक्षरशः झपाटून जाऊन रात्रीचा दिवस करून सरांनी तो PROJECT १४ दिवसांत पूर्ण केला. आणि निर्विवादपणे नलेश पाटणकर यांच्या “PI ” या कंपनीचे TECHNICAL DIRECTOR झाले. यामुळे अर्थात सरांचा क्लास बंद वगैरे झाला नाही, तर पूर्वीपेक्षा जोरात चालू झाला. संगणक शास्त्राच्या अनेक शाखांचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. फक्त शिकून ते थांबले नाहीत, तर त्यापुढे ज्ञान-दान करण्यासाठी ते कायम तत्पर राहिलेले आहेत. प्रत्येक माणूस दुसऱ्याला शिकवताना स्वतः पुन्हा शिकत असतो, यावर त्यांचा विश्वास आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सरांच्या क्लासची फी विद्यार्थी ठरवतात; सर किंवा मॅडम नाही. शिकवण्याच्या उर्मीतूनच पुढे “SUNBEAM ” शी सरांचा संपर्क आला. आणि त्यांच्या “शिक्षक” या व्यक्तित्वाला अनेक परिमाणे लाभली. अनेक विद्यार्थी चाहते किंवा चाहते विद्यार्थी मिळाले.
आता थोडेसे UNIX च्या क्लास विषयी…
क्लास मध्ये संगणक नाही!!! (खरंच नाही) “मुळात मेडिकल शिकवताना मला मानवी शरीर लागत नाही, तर संगणक शिकवताना संगणक का लागेल ?” अशी त्यांची धारणा आहे . UNIX Internals सारखा अवघड विषय सोपा करून सांगणे, इतकेच नव्हे तर तो मुलांच्या मेंदूत कायमस्वरूपी भिनवणे हे असाध्य काम साध्य करणे गोखले सरच करू जाणे… याच क्लासमध्ये सरांमधला “नट”, सरांमधला “नाट्य-दिग्दर्शक”, सरांमधले “ज्योतिषी”, सरांमधले “डॉक्टर ” असे सगळे मुलांना दर्शन देतात. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील रोचक उदाहरणे देऊन प्रसंगी हशा पिकवून मुलांना तास चालू असताना खिळवून ठेवणे आणि मुलांच्या नकळत त्यांना खूप काही शिकवणे ही त्यांच्या अध्यापन-शैलीची वैशिष्ठ्ये सांगता येईल. “साधी राहणी व उच्च विचारसरणी ” या गुणांमुळे विद्यार्थी-वर्गात ते विशेष प्रिय आहेत.
त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरावे असे यश म्हणजे – ६ जून २०१० रोजी सर “FINAL CUT STUDIO MASTER ” झाले. APPLE सारख्या नामांकित आणि दर्जेदार कंपनीच्या ” FINAL CUT STUDIO ” या प्रणालीच्या संचात असलेल्या एकूण पाचही प्रणालींच्या परीक्षा ते विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. या आव्हानात्मक (बहुधा त्यामुळे तथाकथित कुशल संगणक-अभियंत्यांना माहीत नसणाऱ्या) या परीक्षांविषयी थोडी माहिती: FINAL CUT STUDIO मध्ये “चित्रमुद्रण आणि ध्वनीमुद्रण संपादन” (AUDIO – VIDEO EDITING ) करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या प्रणाली आहेत. चित्रपट क्षेत्र याच्यावाचून सध्या तरी तग धरू शकत नाही. या खास प्रणालींची नावे व थोडक्यात उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :

FINAL CUT PRO – “DV , SD आणि HD या VIDEO FORMATs चे REAL TIME EDITING “.
COLOR – “Color grading application “.
MOTION – “Real-time motion graphics design”.
SOUNDTRACK PRO – “Advanced audio editing and sound design”.
DVD STUDIO PRO – “Encoding , authoring and burning.”

या सर्व प्रणालींचा सर्वांगीण अभ्यास करून सर्व परीक्षा उत्तम गुणांनी पास होणारे म्हणजेच FINAL CUT STUDIO MASTER होणारे गोखले सर भारतीय उपखंडातील पहिलेच आहेत.
सध्याच्या 3G जमान्यातसुद्धा कसबा पेठेतील कानडे वाड्यात गुरुकुल वातावरणात क्लास घेणारे गोखले सर, यांच्यासाठी उपमेय व्यक्ती-विशेषण सुचणे कठीण आहे. “सागर: सागरोपमा” असे म्हणतात त्याप्रमाणे गोखले सरांना त्यांचीच उपमा देणे योग्य होय. ईश्वर त्यांना अनेक “ध्येयवेडे” शिष्य देवो हीच प्रार्थना!!!

(क्रमशः)

Comments are closed.