गोखले-सर

ह.भ.प. डॉ. गोखले सर : एक बहुआयामी व्यक्तिमत्व

“अष्टावधानी” हे विशेषण कृतीतून खरे करून दाखवणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे  डॉ. विजय गोखले! वैद्यकीय शिक्षण घेतलेला एक धडाडीचा माणूस कर्तृत्वाच्या जोरावर किती क्षेत्रे पादाक्रांत करू शकतो  याचे उत्तम उदाहरण  डॉ. विजय गोखले ! ते ज्या क्षेत्रांत काम करत आलेले आहेत त्यांविषयी ही माहितीची मालिका आहे. त्यांच्या विषयी माहिती सांगण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या पदवीशी विसंगत, असा एक पैलू उलगडत आहे :

भाग १:संगणक प्रेमी

१९९७ साली सरांचा संगणकाशी प्रथम परिचय झाला. काळाची गरज म्हणून कर्ज काढून घेतलेला संगणक नंतर आपल्या आयुष्यावर आणि कैक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सखोल परिणाम करणार आहे याची पुसटशी कल्पनासुद्धा तेव्हा सरांना नव्हती. एक डॉक्टर असून त्यांची संगणकाशी ओळख कशी झाली, हे जाणून घेणे रंजक ठरेल. १९९१ पासूनच सर मेडिकलचे क्लासेस घेत होते. १९९२-९३ च्या सुमारास ज्योतिष त्यांच्या आयुष्यात आले. आणि कोणतीही गोष्ट झोकून देऊन करणाऱ्या सरांनी अल्पावधीतच त्यावर प्रभुत्व मिळवले. हाताने कुंडली बनवण्यापेक्षा आपण संगणकाची मदत घेऊन कुंडली का बनवू नये, असा विचार मनात आल्यावर ज्योतिषाचे SOFTWARE बनविण्यासाठी म्हणून ८ एप्रिल १९९७ रोजी पाडव्याच्या शुभ-मुहूर्तावर त्यांनी संगणक घेतला. DOS च्या COMMAND PROMPT पासून त्यांचा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला. संगणकाचे चांगले वापर-कर्ते ( USER ) झाल्यावर संगणक प्रणाली ( SOFTWARE ) लिहिण्यासाठी PROGRAMMING LANGUAGEs शिकणे आवश्यक होते. दैवयोगाने त्यांना पहिले पुस्तक वाचायला मिळाले ते म्हणजे – “The C Programming Language ” by K & R . आता सुरुवातच अशा अवघड समजल्या जाणाऱ्या पुस्तकाने झाल्यामुळे पुढे तशीच पुस्तके वाचायची सवयच जणू जडली. लहानपणापासूनच पुस्तके वश करून घेण्याची विशेष कला त्यांना अवगत होती. मुळात डॉक्टर असल्याने अवघड वाचण्याची, शिकण्याची गोडी लागली होती. संपूर्ण स्वतःचे “ज्योतिष SOFTWARE ” बनवेपर्यंत त्यांनी स्वतःच्या नकळत WINDOWS PROGRAMMING चे सखोल ज्ञान प्राप्त केले होते.

अशातच २००३ साली त्यांनी पहिली WINDOWS PROGRAMMING ची बॅच सुरू केली. त्या वेळी चार विद्यार्थ्यांचे रोपटे असलेला क्लास आज सरांकडून शिकून गेलेल्या आणि शिकत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा वट-वृक्ष झाला आहे. २००४ साली त्यांना त्यांच्या अतुलनीय ज्ञानाची बाहेरच्या जगात असेलेली किंमत सांगणारी एक घटना घडली. सरांच्या मित्राचा भाऊ नलेश पाटणकर पुण्यात कंपनी सुरू करण्याच्या विचारात होता. कंपनीच्या पहिल्या PROJECT बद्दल त्यांनी सरांना कल्पना दिली, आणि विचार करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देऊन काही कामानिमित्त ते बाहेरगावी गेले. हा PROJECT म्हणजे आपल्याला असलेले एक आव्हान आहे असे समजून अक्षरशः झपाटून जाऊन रात्रीचा दिवस करून सरांनी तो PROJECT १४ दिवसांत पूर्ण केला. आणि निर्विवादपणे नलेश पाटणकर यांच्या “PI ” या कंपनीचे TECHNICAL DIRECTOR झाले. यामुळे अर्थात सरांचा क्लास बंद वगैरे झाला नाही, तर पूर्वीपेक्षा जोरात चालू झाला. संगणक शास्त्राच्या अनेक शाखांचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. फक्त शिकून ते थांबले नाहीत, तर त्यापुढे ज्ञान-दान करण्यासाठी ते कायम तत्पर राहिलेले आहेत. प्रत्येक माणूस दुसऱ्याला शिकवताना स्वतः पुन्हा शिकत असतो, यावर त्यांचा विश्वास आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सरांच्या क्लासची फी विद्यार्थी ठरवतात; सर किंवा मॅडम नाही. शिकवण्याच्या उर्मीतूनच पुढे “SUNBEAM ” शी सरांचा संपर्क आला. आणि त्यांच्या “शिक्षक” या व्यक्तित्वाला अनेक परिमाणे लाभली. अनेक विद्यार्थी चाहते किंवा चाहते विद्यार्थी मिळाले.

आता थोडेसे UNIX च्या क्लास विषयी…
क्लास मध्ये संगणक नाही!!! (खरंच नाही) “मुळात मेडिकल शिकवताना मला मानवी शरीर लागत नाही, तर संगणक शिकवताना संगणक का लागेल ?” अशी त्यांची धारणा आहे . UNIX Internals सारखा अवघड विषय सोपा करून सांगणे, इतकेच नव्हे तर तो मुलांच्या मेंदूत कायमस्वरूपी भिनवणे हे असाध्य काम साध्य करणे गोखले सरच करू जाणे… याच क्लासमध्ये सरांमधला “नट”, सरांमधला “नाट्य-दिग्दर्शक”, सरांमधले “ज्योतिषी”, सरांमधले “डॉक्टर ” असे सगळे मुलांना दर्शन देतात. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील रोचक उदाहरणे देऊन प्रसंगी हशा पिकवून मुलांना तास चालू असताना खिळवून ठेवणे आणि मुलांच्या नकळत त्यांना खूप काही शिकवणे ही त्यांच्या अध्यापन-शैलीची वैशिष्ठ्ये सांगता येईल. “साधी राहणी व उच्च विचारसरणी ” या गुणांमुळे विद्यार्थी-वर्गात ते विशेष प्रिय आहेत.
त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरावे असे यश म्हणजे – ६ जून २०१० रोजी सर “FINAL CUT STUDIO MASTER ” झाले. APPLE सारख्या नामांकित आणि दर्जेदार कंपनीच्या ” FINAL CUT STUDIO ” या प्रणालीच्या संचात असलेल्या एकूण पाचही प्रणालींच्या परीक्षा ते विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. या आव्हानात्मक (बहुधा त्यामुळे तथाकथित कुशल संगणक-अभियंत्यांना माहीत नसणाऱ्या) या परीक्षांविषयी थोडी माहिती: FINAL CUT STUDIO मध्ये “चित्रमुद्रण आणि ध्वनीमुद्रण संपादन” (AUDIO – VIDEO EDITING ) करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या प्रणाली आहेत. चित्रपट क्षेत्र याच्यावाचून सध्या तरी तग धरू शकत नाही. या खास प्रणालींची नावे व थोडक्यात उद्दिष्टे पुढीलप्रमाणे :

FINAL CUT PRO – “DV , SD आणि HD या VIDEO FORMATs चे REAL TIME EDITING “.
COLOR – “Color grading application “.
MOTION – “Real-time motion graphics design”.
SOUNDTRACK PRO – “Advanced audio editing and sound design”.
DVD STUDIO PRO – “Encoding , authoring and burning.”

या सर्व प्रणालींचा सर्वांगीण अभ्यास करून सर्व परीक्षा उत्तम गुणांनी पास होणारे म्हणजेच FINAL CUT STUDIO MASTER होणारे गोखले सर भारतीय उपखंडातील पहिलेच आहेत.
सध्याच्या 3G जमान्यातसुद्धा कसबा पेठेतील कानडे वाड्यात गुरुकुल वातावरणात क्लास घेणारे गोखले सर, यांच्यासाठी उपमेय व्यक्ती-विशेषण सुचणे कठीण आहे. “सागर: सागरोपमा” असे म्हणतात त्याप्रमाणे गोखले सरांना त्यांचीच उपमा देणे योग्य होय. ईश्वर त्यांना अनेक “ध्येयवेडे” शिष्य देवो हीच प्रार्थना!!!

भाग २: कलासक्त

१९८७ साली नाटकाचा प्रवेश सरांच्या आयुष्यात झाला ( किंवा सरांचा ‘प्रवेश’ नाट्य क्षेत्रात झाला ), तेव्हा सर कॉलेज मध्ये होते. या दिवसांना मंतरलेले म्हणण्याची प्रथा आहे. सरांचे ते दिवस मात्र खरोखरच नाट्यमय घडामोडींचे होते. कुणाचीही प्रत्येक गोष्ट गंभीरपणे ऐकून घेणारा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा एक विद्यार्थी म्हणून कॉलेज मध्ये ते सुपरिचित होते. १९८६ ते १९९१ हा त्यांचा टिळक आयुर्वेदिक कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षणाचा काळ.

त्यावेळी “महाशाळा” नावाच्या कॉलेज मधील हॉलमध्ये त्यांच्या नाटकाच्या तालमी होत असत. सरांचे मित्र नाटक बसवत असताना त्यांना भूमिकेसाठी विचारण्यात आले. अडखळत बोलणाऱ्या सरांना नाटकात अभिनय करणे हे आव्हान वाटले. आणि ते त्यांनी स्वीकारले. मेहनत घेऊन त्यांनी वाचिक अभिनय सुधारला आणि “महाशाळा” मध्ये त्यांचा पहिला “संवाद” (DIALOGUE ) अस्खलित पणे म्हटला. हे पहिले पाऊल त्यांना कला-क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी प्रेरणादायी ठरले. याच नाटकामुळे सर त्यांच्या कोशामधून बाहेर पडले. हडपसर सारख्या त्यावेळी ग्रामीण असलेल्या पुण्याच्या उपनगरातून आलेला, न्यूनगंड असणारा एक विद्यार्थी आता स्वतःला पैलू पाडण्याकरता तयार होत होता.

नाटकातील अभिनयाची त्यांची कारकीर्द सफल होण्यास डॉ. मोहन आगाशे यांचा हातभार लागला. THEATRE ACADEMY तर्फे घेण्यात आलेल्या एका कार्यशाळेत डॉ. मोहन आगाशे यांनी सरांच्या उच्चारांचे आणि अडखळण्याचे विवेचन (ANALYSIS ) केले. बहुतेक वेळा सरांना वृद्ध व्यक्तींची कामे मिळत. वृद्ध मांत्रिक, वयस्कर वाटसरू, आजोबा अशा भूमिका त्यांनी केल्या. आलेली भूमिका विना-तक्रार चोख बजावणे ही त्यांची सवय! COUNTDOWN , “टक्कल पडलेली सुंदरी”, “बोट फुटली”, “संक्रमण”, “चांगुणा”, THE ESCAPE ही त्यांच्या संस्थेची काही उल्लेखनीय नाटके! “संक्रमण” मध्ये OEDIPUS COMPLEX वर भाष्य केले होते. तर “चांगुणा” मध्ये मूल होते नसलेल्या स्त्रीचे आयुष्य दाखवण्यात आले होते. त्यांनी केलेल्या नाटकांचे विषय जितके वेगळे होते तितक्याच विविध प्रकारची तांत्रिक कामे सुद्धा ते अंगावर घेत असत. प्रकाश-योजना, रंगभूषा, वेशभूषा अशा सर्व अंगांनी नाटकाचा विचार केल्याशिवाय त्यांना राहवत नसे, त्यामुळे त्यांचा खरा कल अभिनय नसून दिग्दर्शन आहे हे त्यांच्या लक्षात आले. सर्वंकष विचार करण्याची क्षमता त्यांच्यात होतीच. कॉलेज कडून नाटके बसवत असतानाच त्यांनी दिग्दर्शनाला सुरवात केली. एकदा तालीम सुरु झाली की त्यांना कशाचेच भान राहत नसे. कॉलेज संपल्यावर त्यांनी “प्रतिबिंब” ही नाट्यसंस्था सुरु केली आणि स्वतःबरोबरच अनेक कलोपासकांच्या कलांना वाव दिला. स्वतःच्या संस्थेच्या नाटकांचे दिग्दर्शन करता करता इतर नाट्य -संस्थांची नाटके सुद्धा सर दिग्दर्शित करीत, त्यामुळे अनेक पारितोषिक विजेत्या नाटकांचे DIRECTOR किंवा GHOST DIRECTOR सुद्धा (पडद्यामागील दिग्दर्शकसुद्धा ) सर असत. अभिनेत्याला विषय माहीत नसताना सुद्धा आशयघन अभिनय करून घेणे ही त्यांच्या दिग्दर्शनाची खासियत होती.

एका नाट्य स्पर्धेची आठवण: एकदा चिपळूण ला “THE ESCAPE” चा प्रयोग होता. नाटकाला पहिले बक्षिस मिळाले आणि सर्व युनिट परत निघाले. सर त्यावेळी कुणाची तरी स्कूटर चालवीत होते. समोर गाय आली की म्हैस ते आठवत नाही पण सरांना मोठा अपघात झाला. ३ मोठे FRACTURES झाले. त्यांच्या मित्राला सुद्धा बरेच लागले. त्या अपघातातून ते बरे होईपर्यंत MADAM नी (MADAM म्हणजे सरांच्या सुविद्य पत्नी: सौ. रमा विजय गोखले) त्यांची शुश्रूषा केली ; हाच प्रसंग त्यांना लग्नाच्या बंधनात बांधण्यात कारणीभूत ठरला. काही अपघात चांगले असतात ते असे!

१९९३ साली सरांनी मेडिकल चे क्लास सुरु केले. १२ वी च्या मुलांचा क्लास सुद्धा त्यांनी पूर्वी घेतला होता. नाटकात काम केल्यामुळे आणि वाचिक अभिनय सुधारल्यामुळे त्यांच्या शिकवणीला नवीन परिमाणे लाभली. अमिताभ च्या एखाद्या संवादाला जशी दाद मिळावी तशी दाद त्यांना क्लासमध्ये मिळत आलेली आहे. आयुर्वेदिक डॉक्टर असूनसुद्धा त्यांच्या क्लासला MBBS आणि BHMS चे विद्यार्थी येत असत. क्लासचा त्यांचा तास एखाद्या प्रयोगा-प्रमाणे रंगत असे आणि आजही रंगतो.

सरांचा टिळक आयुर्वेदिक कॉलेजचा ग्रुप हा कॉलेज मधील सर्वांत प्रसिद्ध (किंवा कुप्रसिद्ध) होता. स.प. महाविद्यालयासमोर “उदय विहार” येथे त्यांचा कट्टा होता. जुनी गाणी लावून कॅरम खेळणे हा त्यांचा विरंगुळा ! पैजा लावून गाण्याचा गायक, गीतकार, संगीतकार, चित्रपट ओळखणे ह्यात सरांचा हातखंडा होता. पिक्चर, नाटके , तालीम हे सगळे करून सर रात्री जागून अभ्यास करीत आणि परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास मिळवीत असत. यश मिळवण्यासाठी अंगी प्रतिभा (TALENT ) असणे आवश्यक नसते तर अविरत कष्ट करून यश संपादन करता येते, हेच यावरून दिसून येते. अभ्यास ही कुणीतरी लादलेली गोष्ट आहे असे न समजता सर कायम अभ्यास एन्जॉय करीत. “गुडलक”, “रिगल”, मधुबन अशा हॉटेल्स मध्ये सर अभ्यास करत असत (!) हॉटेल मध्ये अभ्यास कसा होऊ शकतो हे कोडे मला अजून सुटलेले नाही. त्यांनी मात्र ते तेव्हापासून जमवलेले आहे. नाटक, प्रेयसी, चित्रपट, कॅरम आणि व्यसनं हे सगळं करताना त्यांनी अभ्यासाचेही व्यसन लावून घेतले होते. (बाकी सर्व सुटली तरीही हे व्यसन अजूनही त्यांना जडलेले आहे). अभ्यासाचा आस्वाद घेत ज्ञानाची उपासना, हे त्यांचे तेव्हापासून तत्व राहिलेले आहे.

शिवाय कॉलेजच्या काळात पिक्चर बघण्याचे त्यांना प्रचंड वेड होते. MADAM नी मला सांगितल्याचे आठवते: “कधी कधी ते घरी येताना चित्रपटांच्या १०-१५ VCR कॅसेट्स आणत आणि मग पुढील संपूर्ण दिवस चित्रपट पाहणे आणि खाणे हाच आमचा उद्योग असे.” “चित्रपट कशाशी खावा” हे मात्र सरांकडून शिकावे. बारकाव्यांसकट तांत्रिक बाबी लक्षात ठेवतानाच ते दिग्दर्शकापासून पटकथा लेखकापर्यंत सर्वांची नावे लक्षात ठेवतात , मग तो चित्रपट हिंदी असो ,मराठी असो वा इंग्रजी! एखाद्या दिग्दर्शकाला सुद्धा आठवणार नाही इतकी माहिती ते लक्षात ठेवतात असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

१९९६ साली सोहम करंडक नाट्य स्पर्धेमध्ये सरांनी प्रतिबिंब या त्यांच्या नाट्य संस्थेद्वारे “THE DEATH OF CONQUEROR” ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेमध्ये जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलर याचे २० एप्रिल १९४५ ते ३० एप्रिल १९४५ या त्याच्या आयुष्यातील बंकर मधल्या शेवटच्या दहा दिवसांचे, म्हणजेच त्याच्या इव्हा ब्राऊ बरोबरील विवाहापासून ते दोघांच्या आत्महत्ये पर्यंतचे सादरीकरण होते. सदर एकांकिकेला बक्षिस मिळाल्यानंतर त्यांच्या रंगभूमीवरील हौशी नाट्य कलेला त्यांनी अर्धविराम दिला. परंतु त्यांनाही कल्पना नव्हती की या “अर्धविरामा”नंतर चे वाक्य हे रंगभूमी”बाहेर” सुरु होणार होते. त्याचे झाले असे …

१९९४ सालापासून ते ज्योतिष अभ्यासत होतेच (याबद्दल आपण पुढील लेखामध्ये पाहू). ज्योतिषातील क्लिष्ट ग्रह-गणिती सूत्रे सोडवण्याचे स्वतःचे SOFTWARE बनवण्यासाठी संगणकाचा उपयोग करावा असा सल्ला त्यांच्या मित्रांनी त्यांना दिला. १९९८ साली संगणक क्षेत्रात येण्यासाठी हे एक निमित्त मात्र ठरले. ज्योतिष आणि आयुर्वेद या विषयांची ची पदवी असूनसुद्धा संपूर्ण पणे नवीन क्षेत्रात उडी घेताना ते कचरले नाहीत. पण संगणक क्षेत्रात येऊन सुद्धा त्यांना कला क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ तोडू म्हटले तरी तोडता आलेली नाही. COMPUTER GRAPHICS मधील सरांचा रस आणि AUDIO VIDEO आणि MULTI – MEDIA PROGRAMMING मधील त्यांचे प्राविण्य यांचा उगम त्यांच्या कलेवरील निष्ठेमध्येच आहे. २०१० साली या संगणकप्रेम आणि कलोपासना यांचा परिपाक म्हणून ते FINAL CUT STUDIO MASTER झाले. (या परीक्षेविषयी मागील लेखात आपण वाचलेले आहेच.)

CDAC च्या DACA कोर्स ला शिकवताना सर दिलीप कुमार यांचा “देवदास”, गुरुदत्त यांचा “प्यासा”, अमिताभ बच्चन यांचा “अग्निपथ”, HARRY POTTER , यांच्या एडिटिंग चे VIDEO व अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या “डॉन” चित्रपटांचा comparative VIDEO दाखवतात. त्यांनी एडिटिंग केलेले हे VIDEO पहिले की – सरांमधील तो कलासक्त माणूस अजूनही क्रियाशील आहे हेच दिसून येते. आजही सर जेव्हा सेमिनार्स मध्ये OpenGL च्या PROGRAMS मधून सुंदर 3D RENDERING यशस्वी झाल्याचे दाखवतात, तेव्हा तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो जो एखाद्या नाटकाचा “प्रयोग” सफल झाल्यावर त्यांच्यातील दिग्दर्शकाला होत असे. विद्यार्थ्यांकडून मिळणारी टाळ्यांची दाद ही त्यांच्यातील केवळ शिक्षकाला नसून अभिनेत्याला आणि दिग्दर्शकालाही असते व ती कायम मिळत राहो हीच मनोकामना!

भाग ३: ज्योतिष्याभ्यासक

तसे म्हटले तर लहानपणापासूनच सरांनी नकळत पणे ज्योतिष शास्त्राचे धडे गिरवायला सुरवात केली होती , कारण सरांचे वडील (श्री. दत्तात्रय गोखले ) हेसुद्धा ज्योतिषाचा अभ्यास करून भविष्य वर्तवित असत. भविष्य सांगणे किंवा ग्रहांचा अभ्यास करून लोकांना मार्गदर्शन करणे हा त्यांचा व्यवसाय नव्हता , मात्र वडिलांनी फावल्या वेळात केलेल्या ह्या अभ्यासाचा परिणाम सरांच्या उत्सुक मनोवृतीवर झाला. पेशाने डॉक्टर असल्याने, आपल्या वडिलांनी त्यांच्याकडे आलेल्या चिंताग्रस्त लोकांना सांगितलेले काही उपाय त्यांना पटत नसत : जसे की- मारुतीला तेल वाहणे , शनिला काळे तीळ वाहणे वगैरे. श्रद्धा आणि शास्त्र यांविषयक वडिलांबरोबर झालेल्या वादविवादामधून सरांनी ज्योतिषाचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्यास प्रारंभ केला. डॉक्टर पेशाला साजेशा चिकित्सक आणि कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा स्वभाव असल्याने सरांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास ग्रहगणितापासून सुरु केला. ग्रह गणिताचा उगम असलेल्या पंचांगाचा, त्या अनुषंगाने आलेल्या American Ephemeris मधील गणितांचा देखील त्यांनी अभ्यास केला. (सूर्य आणि सौरमालेतील ग्रह यांचे नेमके स्थान , पृथ्वीपासूनचे त्यांचे अंतर, त्यांच्या परिभ्रमणा च्या कक्षा आणि बदलणारी अंतरे यांच्या नोंदी आणि अवकाश-विषयक इतर माहिती अमेरिकन एफेमेरिस या नियतकालिकामध्ये येत असे.) छापील पंचांग बघून भविष्य सांगण्यापेक्षा ग्रहांच्या गतीचा आणि कक्षांचा अभ्यास करून , क्लिष्ट गणिते सोडवून अचूक अभ्यासपूर्ण भविष्य सांगणे त्यांना आव्हानात्मक वाटले आणि त्या दृष्टीने त्यांनी व्यासंग वाढवला.
खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजून त्यातील संबंध जोडण्यासाठी (किंवा ज्योतिष शास्त्रामध्ये अचूकपणा आणण्यासाठी) सर पुण्यातील IUCAA( Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) येथील ग्रंथालयात जात असत आणि तासनतास त्यांचे तेथे वाचन चालू असे. त्यावेळी हॉटेल मध्ये अभ्यास करण्याची सवय असतानाही सरांनी ग्रंथालयात मौनीबाबा होऊन चिकाटीने खगोलशास्त्राचे सखोल ज्ञान प्राप्त केले.
त्यावेळी सरांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नारळीकर यांना भेटण्याचा योग आला. एवढा मोठा माणूस असूनही त्यांनी सरांची उत्सुकतेने सर्व चौकशी केली . सरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. सरांनी त्यांना उत्साहाच्या भरात असे सांगितले की – “ज्योतिषातील फलज्योतिष प्रकारात अचूकता यावी म्हणून मी येथे ग्रहगणिताचा अभ्यास करण्यासाठी येतोय” . तेव्हा नारळीकर यांनी सरांना अतिशय परखडपणे सांगितले की “ग्रहगणिताचा अभ्यास करण्यासाठी येऊ शकता, मात्र फल -ज्योतिषाचा अभ्यास करण्यासाठी नाही. ” . तेव्हा सरांना माहीत नव्हते की डॉक्टर नारळीकर आणि फलज्योतिष यांचा छत्तीसचा आकडा आहे. सरांनी डॉक्टर नारळीकरांना आश्वासन दिले आणि मुकाटपणे दररोज फक्त ग्रह गणिताचा अभ्यास करू लागले. आयुका (IUCCA ) मध्ये उपलब्ध असलेल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांचा ( वराहमिहिर, भास्कराचार्य, आर्यभट्ट यांनी लिहिलेल्या) आणि आधुनिक खगोलशास्त्रीय गणित यांचा तौलनिक अभ्यास त्यांना करता आला.
मोठमोठी समीकरणे वापरून पंचांगातील ग्रहांची स्थाने , सांपत्तिक काळ , सूर्योदय, सूर्यास्त, तिथीगणित, सूर्य ग्रहण -चंद्र ग्रहणाचे गणित, अयनांशाचे गणित या सर्व गोष्टी पंचांग न पाहता करू लागले. तसेच आधुनिक गणितातील “right ascension, declination, altitude, azimuth, parallax, geocentric-ecliptic-heliocentric-lattitudes and longitudes, perturbations” अशा संज्ञा असणारी समीकरणे सुद्धा सोडवू लागले. ही सर्व गणिते ते “Ajanta Orpat fx 100D” या calculator वर करीत असत. (तो calculator अजूनही चालू असून सरांनी जपून ठेवला आहे )

सरांच्या अभ्यासाला मित्रांचा हातभारही लागला , तो पुढीलप्रमाणे :सरांनी जेव्हा सुरेश शहासने लिखित क्रुष्णमूर्ती ज्योतिष रहस्य या ग्रंथाचे तीन खंड पंचांग, गणित, आणि फलादेश वाचून अधिक अभ्यास करण्याचा मानस व्यक्त केला तेव्हा त्या वेळी त्या ग्रंथांची किंमत ७५० रुपये होती आणि त्यावेळी ती किंमत सरांसाठी मोठी होती. अशा वेळी अरुण भालेराव (सरांचे मित्र दीपक भालेराव यांचा मोठा भाऊ) यांनी सरांना बरोबर नेऊन अप्पा बळवंत चौकातून त्या ग्रंथांची खरेदी केली आणि सरांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.

वरील सर्व अभ्यासाचा परिणाम असा झाला की ज्योतिष शिकून फल -ज्योतिषाची practice करण्या ऐवजी calculator वरची गणिते वापरून , ती पुढे ज्योतिषाचे software बनवण्यासाठी वापरावी असे सरांच्या मनाने घेतले. स्वतःचे software बनवण्यासाठी कॉम्पुटर शिकणे अनिवार्य होते, तेही सरांनी मनावर घेतले. संगणक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ज्योतिष अशा प्रकारे कारणीभूत ठरले. आता ज्योतिष दूर जाऊन कॉम्पुटर सरांच्या जवळ आला आहे आणि बघता बघता सर्वस्व झाला आहे. अजूनही सरांचा ज्योतिषाचा अभ्यास आहे , पण फक्त अभ्यासच !
फलज्योतिष आणि खगोलशास्त्र यांचा प्रदीर्घ कालावधी साठी अभ्यास करत असतानाच सरांनी पुढील शैक्षणिक पदवी सुद्धा घेतलेल्या आहेत : “ज्योतिष विशारद” (१९९५) ,”कृष्णमूर्ती विशारद”(१९९६), आणि “ज्योतिष शास्त्री”(१९९७-या परीक्षेतील फलादेश विषयात सर्वाधिक गुण) . एखाद्या विषयाचे ज्ञानार्जन आणि मग औपचारिकता म्हणून (जगाला सिद्ध करून दाखवावे म्हणून) मग पदवी असा हा उलटा प्रवास चकित करणारा तर आहेच शिवाय तो प्रेरणादायीसुद्धा आहे. आजच्या प्राधान्याने “परीक्षार्थी” असणाऱ्या तरुणांना “विद्यार्थी” बनण्यास असा ज्ञानाची कास धरणारा प्रवास उद्युक्त करो हीच सदिच्छा !

(क्रमशः)